Join us

विशाखा सुभेदारच्या या साडीचं आहे लता मंगेशकरांसोबत खास कनेक्शन, तब्बल १४ महिन्यांनंतर नेसली साडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 4:21 PM

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या लता दीदी चाहत्या होत्या.

आपल्या सुमधुर गायनाने केवळ देशातीलच नाही, तर जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे गायिका लता मंगेशकर. एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी लतादीदी हे जग सोडून गेल्या. आज लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतीदिन. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड गेल्या. दीदी आज आपल्यात नाहीत पण त्यांचे स्वर आणि गाणी आपल्या मनात कायम राहतील. विविध क्षेत्रातून लतादिदींच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदारनेही लतादीदींच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

 महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या लता दीदी चाहत्या होत्या. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांचे विनोद त्यांना प्रचंड आवडायचे. लता दीदींनी समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांच्यासाठी एक खास भेटवस्तू देखील पाठवली होती.  विशाखा सुभेदारसाठी दोन साड्या पाठवल्या होत्या. लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने विशाखा सुभेदारने एक साडी परिधान करत फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत एक पोस्ट लिहिली आहे. 

विशाखा सुभेदारची पोस्ट आज हा फोटो माझा नाही तर ह्या मी नेसलेल्या साडीचा आहे...हे वस्त्र नाही हा आशीर्वाद आहे.. भारतरत्न, गानकोकिळा. लता मंगेशकर.. ह्यांचा.हास्यजत्रेमधलं उर्दू गायिका, हे पात्र निभावलेले ते स्किट त्यांना प्रचंड आवडलं, त्या म्हणाल्या तू उर्दू बोललीयस ते फार छान बोललीयस.. मी सुद्धा अनेक उर्दू शब्द गायलेयत,त्यांचे उच्चार अवघड असतात. तू खरच खुप छान जमवलंस. आणि त्यांनीही नाटकात काम केलं त्या वेळेस झालेली गंमत देखील सांगितली.त्यांनी शाबासकी म्हणून हा आशीर्वाद दिला.covid प्रकरण निवळलं किं आम्ही भेटायला जाणार होतो पण... दुर्दैव.राहून गेलं. त्या आपल्यात नाहीयत पण त्यांचा आवाज आपल्याला जिवंत ठेवतो..! अंगाई ते म्हातारपण सगळ्या वयाशी त्यांचा आवाज त्यांची गाणी connect होतात. आणि त्या सर्वश्रेष्ठ बाईंचा, लतादीदींचा,आम्हाला फोन आला..!त्यांनी फोन वर केलेल्या गप्पा आजही माझ्या कानात आहेत.. तो दिवस न विसरण्यासारखा होता.ही साडी अंगावर नेसताना काय वाटत होत ते मी शब्दात नाही सांगू शकत..देवाचे आभार मानले, लताबाईंचे नाव घेतले त्यांना सांगितलं "तुम्ही दिलेली साडी नेंसतेय."आणि Samir Choughule , Sachin Mote, Sachin Goswami हास्यजत्रेचे Amit Phalke चे सुद्धा आभार मानले.ह्या सगळ्यांमुळेच हे आशीर्वाद रुपी वस्त्र मला मिळाले. आज लतादीदींचा स्मृतीदिन..

लता मंगेशकर यांच्या आवाजाने प्रत्येक देशवासियाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आकाशात देव आहे का असं कुणी विचारलं तर देवाचं माहीत नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या महतीचं वर्णन केलं होतं.    

टॅग्स :लता मंगेशकरमहाराष्ट्राची हास्य जत्रा