आपल्या सुमधूर आवाजाने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध करणारी दिवंगत गायिका म्हणजे लता मंगेशकर (lata mangeshkar). गानसम्राज्ञी असा लौकिक मिळवणाऱ्या लता मंगेशकर यांचं निधन होऊन बराच काळ झाला. मात्र, त्यांची आणि त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. त्यामुळे वरचेवर त्यांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. यामध्येच सध्या लता मंगेशकर यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. ज्या नावामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली ते त्यांचं खरं नाव नाही.
लता मंगेशकर यांचं खरं नाव लता नसून हेमा असं आहे. लता मंगेशकर यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं नाव हेमा असं ठेवण्यात आलं होतं. मात्र, पुढे जाऊन त्यांचं हे नावदेखील बदलण्यात आलं. लता मंगेशकर यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर भावबंधन हे नाटक करत होते. या नाटकात एका स्त्री पात्राचं नाव लतिका असं होतं. हे नाव दीनानाथ मंगेशकरांना इतकं भावलं की त्यांनी लता मंगेशकरांचं हेमा हे नाव बदलून लतिका असं केलं.याच नावाचं पुढे लता झालं आणि याच नावाने त्या जगभरात प्रसिद्धही झाल्या.
दरम्यान, गाणसम्राज्ञी, गाणकोकीळा अशी कित्येक विशेषणं लता मंगेशकर यांना मिळाली. उत्तम आवाजाच्या जोरावर कानसेनांना तृप्त करणाऱ्या या ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.