Marathi Bhasha Din : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अजय-अतुल (Ajay Atul) या संगीतकार जोडीने एक तक्रार केली आहे. होय, मराठी कलाकार सुद्धा सेटवर मराठी नाही तर हिंदीत संवाद साधतात, अशी तक्रार अतुलने केली. मराठीचे दिग्गज दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही मराठी भाषेला दुय्यम स्थान दिलं जातं, याबद्दल खंत व्यक्त केली.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘गावातले लोक मुंबईत आले की, त्यांना मराठी बोलायला लाज वाटते. मी हॉटेलमध्ये अनेकदा मराठीत बोलतो. पण पलीकडून काही उत्तरच येत नाही. तिसऱ्यांदा बोलल्यावर कळतं की समोरची व्यक्ती ही मराठीच आहे,’ असं नागराज या मुलाखतीत म्हणाले.
यावर अतुल यांनीही त्यांची री ओढत, मराठी कलाकारही सेटवर हिंदीत बोलतात, अशी तक्रार बोलली. काही मराठी कलाकार सेटवर हिंदीत बोलतात. मी नाव घेत नाही. पण सरळ क्या चल रहा है, कैसा है आज कल, असं त्यांचं सुरू होतं. तू काय हिंदीत बोलतोयस बाबा, असा विचार आमच्या मनात येतो, असं अतुल म्हणाले. मी आणि अतुल आम्ही कुठेही गेलो तरी मराठीत बोलतो. निर्माता हिंदी असला, त्याला मराठी कळत नसली तरीही आम्ही मराठीतच बोलतो. गायकांसोबतही आम्ही मराठीत चर्चा करतो, असं ते म्हणाले.