‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला यंदा मराठीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी हजेरी लावली. मराठी सेलीब्रिटींनी या फेस्टिव्हलला इतक्या संख्येने हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ होती. जागतिक स्तरावरही मराठी चित्रपट प्रगती करत असल्याचे यातून दिसून येत आहे. यंदाच्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘हलाल’, ‘रिंगण’ आणि ‘वक्रतुंड महाकाय’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश झाला. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ म्हटले की पूर्वी त्यात केवळ हॉलिवूड आणि बॉलीवूडमधले कलाकारच झळकायचे. पण या वर्षीपासून या फेस्टिव्हलमध्ये मराठी कलाकार, दिग्दर्शक, निर्मातेही झळकायला लागले आहते. यावरून मराठी चित्रपट जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे, असे नक्कीच म्हणावे लागेल. ‘रिंगण’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला गेल्यावर आपल्या चित्रपटाविषयी अनुराग कश्यप, सुधीर मिश्रा, नंदिता दास यांसारख्या बॉलीवूडमधील लोकांनाही खूप चांगली माहिती आहे हे ऐकल्यावर चित्रपटाचे निर्माते मकरंद माने खूपच खूश झाले. या फेस्टिव्हलमुळे जगभरात चित्रपट कशा प्रकारे पोहोचवता येतात याचा अभ्यास करता आला. तसेच या फिल्म फेस्टिव्हलमुळे मराठी चित्रपटांसाठी जागतिक बाजारपेठ उघडी झाली, याची जाणीव झाली. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतो याचा आत्मविश्वास वाढल्याचे ते सांगतात. ‘हलाल’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या निमित्ताने या चित्रपटाचे निर्माते अमोल कांगणे आणि या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रीतम कांगणे ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला गेले होते. ‘हलाल’ या चित्रपटाला तिथे खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या निमित्ताने त्यांची भेट निर्माते अनुराग कश्यप, सुधीर मिश्रा, नंदिता दास यांसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांशी झाली. अनुराग याच्यासोबत तीन तास चर्चा करण्याची संधी मिळाल्याचे अमोल सांगतात. अनुराग यांना ‘हलाल’ची कथा खूप आवडली असल्याचे अमोल यांनी सांगितले. तसेच अमोल यांना अनुरागसोबत मराठी सिनेमा आणि जागतिक सिनेमा यावर चर्चादेखील करायला मिळाली. नंदिता यांनी या चित्रपटाचा विषय हा जागतिक पातळीवरचा असल्याने हा चित्रपट हिंदीतही बनवला जावा तसेच अनेक देशांत हा चित्रपट प्रदर्शित करावा, असे अमोल यांना सांगितले. अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारे कान फेस्टिव्हलला ‘प्रोड्युर्सस वर्कशॉप’साठी गेला होता. तिथे त्याला जगभरातील अनेक निर्मात्यांना भेटण्याची संधी मिळाली. तिथे खूपकाही शिकायला मिळाले असे तो सांगतो. वेगवेगळ्या देशांतील चित्रपटांविषयी, जागतिक चित्रपटांविषयी अभ्यास करण्याची संधी मिळाली असल्याचेही तो सांगतो. तसेच तिथे त्याला ‘गेम आॅफ थ्रोन्स’च्या निर्मात्या बर्नाडिट कॉलफिल्ड यांना भेटण्याची संधी मिळाली. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तंत्रज्ञानाविषयी त्या दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच दोघांनीही एकमेकांच्या मालिकांविषयी जाणून घेतले. त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा क्षण हा अविस्मरणीय असल्याचे तो सांगतो. ‘रामण राघव २.०’ या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर अनेक वेळ लोक केवळ टाळ्या वाजवत होते. त्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला, त्याचा खूपच आनंद झाला असल्याचे अमृता सांगते. अमृता ‘ज्युलिएटा’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठीदेखील गेली होती. स्क्रीनिंगचे व्हीआयपी पासेस तिच्याकडे असल्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक पेड्रो आलमोदोवर यांच्या अतिशय जवळ अमृताला उभे राहता आले. आलमोदोवर यांची ती मोठी फॅन असल्याने त्यांना इतक्या जवळून पाहण्याचा अनुभव शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असे ती सांगते.
‘कान’मध्ये मराठी सेलीब्रिटींची धूम
By admin | Published: May 23, 2016 2:58 AM