Join us

अभिनयासाठी वडिलांनी नकार दिला अन् मी घर सोडलं, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला कठीण काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:18 IST

अभिनेता अभिजीत केळकर हा 'Bigg Boss Marathi Season 2' या शोच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आला.

Abhijeet Kelkar Journey : अभिनेता अभिजीत केळकर हा 'Bigg Boss Marathi Season 2' या शोच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आला. अभिजीत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनेत्याने अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटांमधून काम करत आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं. त्याने केलेल्या 'तुझे माझे जमेना', 'मधु इथे अन् चंद्र तिथे' या मालिका विशेष गाजल्या. शिवाय 'काकस्पर्श', 'बालगंधर्व' या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये कायमच त्याची चर्चा रंगत असते. नुकतीच अभिजीतने 'कॉकटेल स्टुडिओ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे.

या  मुलाखतीत अभिजीत बोलताना म्हणाला, "कॉलेज झाल्यानंतर मी एका केटरिंग कंपनीत नोकरीला होतो. तिथे मी चांगल्या पोस्टला होतो. मी तिकडेच काम केलं असतं तर आणखी खूप चांगल्या पोस्टवर काम करु शकलो असतो. पण, माझ्या मनात अ‍ॅक्टर होण्याची इच्छा कायम होती. जसे इंटर कॉलेज स्पर्धा(आंतरमहाविद्यालयीन ), प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट असा तो अनुक्रम असायचा. पण माझ्याबाबतीत असं काहीच घडलं नाही. त्यामुळे मी जॉब करत होतो. तेव्हा मी फारसा काही आनंदी नव्हतो, पण मी करत होतो. एकदा अचानक माझ्या शाळेतील एक मित्र रस्त्यात भेटला. तेव्हा त्याने माझी विचारपूस केली. तेव्हा त्याने मला तू काय करतोस? असं विचारलं. त्यावेळी मी एक नाटक करत आहे, त्यासाठी रिप्लेसमेंट शोधतो आहे. तेव्हा रिप्लेंसमेंट म्हणजे नक्की काय मला माहितही नव्हतं. पण नाटकात काम करायला मिळतंय या विचाराने मी त्याला होकार दिला. सध्या तरी या नाटकाचे प्रयोग कमी आहेत त्यामुळे तू येऊन बघ आणि ठरवं" असं तो म्हणाला.

पुढे अभिनेता म्हणाला, "त्यावेळी मला नाटक करायला मिळणार  आहे जे मला आयुष्यभर करायचं होतं. मला माझा जॉब सांभाळून ते करता येणार होतं त्यामुळे मी होकार दिला. ते मी सुरु केलं. जॉब करता करता ते मी मॅनेज केलं. दरम्यान, त्याच संस्थेच्या दुसऱ्या नाटकात काम करण्याची संधी मला मिळाली. एकंदरीत हे माझं जे काही चाललंय ते पाहून माझ्या बॉसने मला बोलावलं. साजिद खान असं त्यांचं नाव होतं. त्यावेळी त्यांनी मला अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला चार- सहा महिने सांभाळून घेतलं. त्यानंतर आपल्याला हेच करायचं आहे असं माझं ठरलं होतं. पण घरी कसं सांगायचं हा मोठा प्रश्न होता. मग मी माझ्या घरच्यांना सांगितलं की मला अभिनेता व्हायचा आहे. तेव्हा घरात माझी मावशी ही माझ्या अत्यंत जवळची होती मी सगळ्यात आधी तिला ही गोष्ट सांगितली. मावशीला हे सगळं सांगताच पहिलाच नकार तिने दिला. पण मी म्हणालो, की ठीक आहे. मग मी घरी सांगितलं की मी जॉब सोडतोय. माझ्याकडे दोन नाटक आहेत आणि त्याचे इतके पैसे मला मिळणार आहेत, असं मी सांगितलं. तेव्हा हे नाटक बंद पडलं तर? असा प्रश्न त्यावेळी घरच्यांनी मला केला".

मुलाखती आपल्या सिने-सृष्टीतील प्रवासाबद्दल सांगताना अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारावर भाष्य केलं तेव्हा तो म्हणाला, "माझे आई आणि बाबा दोघेही सरकारी नोकरी करत असल्याने आणि आमची कायम उत्तम आर्थिक परिस्थिती असल्याने तेव्हा हे काम करण्यासाठी मला घरचे नाही म्हणतील, असं कधी वाटलं नाही. पण, त्यावेळी मला घरून प्रचंड विरोध झाला. तेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास नकार दिला. आईचा मला कायमच सपोर्ट राहिला. पण, माझे बाबा खूप कडक आणि शिस्तप्रिय आहेत. तेव्हा त्यांना ते पटण्यासारखं नव्हतं. आता माझं काम पाहिल्यावर त्यांना छान वाटतं. एक क्षण असा आला की  आमच्या घरात खूप भांडण झालं आणि मी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून मी कसाबसा वाचलो. मी तीन-चार दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. त्या घटनेनंतर माझी बहीण तिचा होणारा नवरा आणि माझे काही मित्र अशी मिटींग झाली. तेव्हा माझ्या मित्राने मला सल्ला दिला. आता तू घरातून बाहेर पड. तेव्हा मी घराबाहेर पडलो आणि मित्राच्या ओळखीने मी बाहेर राहू लागलो. आणि तिथून माझा अभिनेता बनण्याचा प्रवास सुरु झाला". 

टॅग्स :अभिजीत केळकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी