Join us

'विनोदी नट' हा शिक्का बसल्याची खंत नाही पण वाईट... अंशुमन विचारेनं व्यक्त केल्या भावना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 1:33 PM

आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे.

Anshuman Vichare : आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'फू बाई फू' तसेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यांसारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत या विनोदी नटाने प्रेक्षकांचं कायम मनोरंजन केलं. 

नुकतीच अंशुमनने 'Cocktail Studio'ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासावर भाष्य केलं आहे. दरम्यान, या मुलाखतीत 'विनोदी नट' असा शिक्का बसल्याची खंत वाटते का? असा प्रश्न विचारल्यावर त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणतो, "खंत नाही पण थोडं वाईट नक्कीच वाटतं. पण एक अभिनेता म्हणून काम करताना मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. पण आवडणं आणि येणं याच्यामधे फार मोठा फरक आहे. पण मला त्या येतात असं माझं मत आहे. शिवाय प्रेक्षकांपर्यंत त्या भूमिका किती पोहचल्या? हे देखील महत्वाचं आहे". 

पुढे तो म्हणाला, "दरम्यान, माझा एकांकिका, राज्यनाट्य आणि त्यानंतर व्यवसायिक असा प्रवास चालू असताना एकांकिका, राज्यनाट्यामध्ये मी नेहमी गंभीर भूमिका केल्या आणि व्यवसायिक नाट्यांमध्ये काम करताना मला विनोदी भूमिका मिळाल्या. आता हा नशिबाचा भाग आहे की वेळचं गणित आहे, हे मला देखील माहित नाही.  पण मी नेहमीच प्रकर्षाने विचार करत गेलो की मला काहीतरी वेगळं करायला हवं. मग मी एकपात्री केलं त्याचबरोबर दीर्घांकही केला. पण लोकांना माझं विनोदी काम जास्त आवडलं. खरंतर नाटकांपेक्षा विनोदी मालिकांमधून माझं काम लोकांपर्यंत जास्त पोहचलं आणि त्यांना ते भावलं. अर्थात आपलं काम चांगलं की वाईट हे लोक ठरवतात. पण मला नेहमीच असं वाटतं की माझ्या चांगल्या, वेगळ्या भूमिका या लोकांनी लक्षात ठेवाव्या" अशी आशा अभिनेत्याने या मुलाखतीत व्यक्त केली. 

वर्कफ्रंट-

एकांकिकांमधून घडलेला हा अभिनेता सध्याच्या घडीला नाटक आणि सिनेमा या क्षेत्रात उत्तम स्थिरावला आहे. 'श्वास', 'पोस्टर बॉईज', 'स्वराज्य', अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये अंशुमन विचारेने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर 'मोर्चा' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं.

टॅग्स :अंशुमन विचारेमराठी अभिनेतासेलिब्रिटी