Ashok Saraf: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांनी गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या ते त्यांच्या आगामी 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सिनेमात अशोक सराफ, वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांच्यासह सुनील बर्वे तसेच सुलेखा तलवळकर, चैत्राली गुप्ते, तनिष्का विशे यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सध्याच्या काळातील विनोद निर्मितीवर भाष्य केलं आहे.
नुकताच अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांनी लोकमत फिल्मीसोबत संवाद साधला. या मुलाखतीमध्ये अभिनेते म्हणाले, "कॉमेडी तसं म्हटलं तर इतकी सोपी नाहीये लोक म्हणतात की काय कॉमेडी असं नाहीये. लोकांना हसवणं फार कठीण आहे आणि सातत्याने हसवणं कठीण आहे आणि तो प्रभाव शेवटपर्यंत ठेवणं हे सगळ्यात कठीण आहे. त्यामुळे कॉमेडी विचाराने करावी लागते आणि कॉमेडी लोकांना आधी विचारात घेऊनच करावी लागते. आता काय झालेलं आहे मोठ्यांना आवडणारी कॉमेडी निश्चित वेगळी असणार कारण त्यांचा काळ वेगळा होता. पण, लहानांची कथा असतील त्यांना वाटेल त्यांचा एक काळ वेगळा आहे. पण, आतापर्यंत मी काम हे केलेली सगळ्यांना आवडेल अशा रीतीनेच आहे.
पुढे अशोक सराफ म्हणाले, "म्हणून माझे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे वेगवेगळे चाहते आहेत. कारण ती त्याला आवडेल पण, यालाही आवडेल ती अशी 'असं मी कुठे घाणेरडं काही बोलणार नाही' की त्यांना "नको रे काय बोलतो हा" आणि मुलं म्हणतील "हे काय नवीन" असं काहीतरी वेगळं असं कधीही येता कामा नये. म्हणजे अशी जर एखादी कुठून जर चुकून लाईन जरी दिसली तरी आम्ही ती पहिल्यांदा काढून टाकतो. अशी कॉमेडी आम्हाला पसंतच नाही अशी कॉमेडी आणि मी करतच नाही तेव्हा आमचं स्वच्छ इतकं सुंदर आणि नाजूक असं म्हटलं तरी हरकत नाही, अशी मस्त आमची कॉमेडी आहे."
दरम्यान,‘राजकमल एंटरटेनमेंट’ प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' हा एक नवीकोरी कथा असलेला चित्रपट येत्या १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.