Prasad Oak : प्रसाद ओक मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता आहे. सध्या प्रसाद धर्मवीर- २ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रसादने मोठ्या कष्टाने आणि टॅलेंटच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत जम बसवला. सध्या प्रसाद 'धर्मवीर २'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच प्रसादसह पत्नी मंजिरी ओकने 'लोकमत फिल्मी'सोबत त्यांच्या लग्नातील मजेशीर किस्से शेअर केले.
नुकतीच प्रसाद ओकने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या लग्नातील भन्नाट किस्से सांगितले. मुलाखती दरम्यान प्रसाद म्हणाला, "लग्नाच्या आदल्या दिवशी प्रयोग संपवून मी लाल डब्याच्या एसटीने पुण्याला गेलो. खरंतर, मला पूर्ण कपडे आवडतच नाही. तेव्हा थ्री-फोर पॅन्टमध्ये मी तसाच मंगल कार्यालयात गेलो. तर हिची आई दरवाजात माझी वाट बघत होती, मी कधी येतोय. मी आलो आणि सासूबाई म्हणाल्या, तुम्ही आलात का? तर आता तयार व्हा. मुळात माझी खेचायची सवय आहे. त्यांना उत्तर देताना मी म्हणालो, तयार काय व्हायचं? मी असाच लग्नाला उभा राहणार. त्यानंतर सासूबाई आतमध्ये जाऊन रडायला लागल्या. तेव्हा त्यांनी मंजुला सांगितलं, अगं! ते लग्नाला अर्ध्या पॅन्टमध्ये उभे राहणार आहेत".
पुढे मंजिरी ओक म्हणाल्या, तेव्हा मला आई म्हणाली, अगं, ते एवढे कपडे घेतलेत, आता त्याचं काय करायचं? आपल्याकडे गावचे लोक आहेत ते लोक काय म्हणतील? अगं! ते लग्नात अर्ध्या 'पॅन्ट'मध्ये उभे राहणार असं म्हणत आहेत. तेव्हा मी आईला म्हटलं, आई अंग! मुळात थ्री-फोर आहे. आणि दुसरं म्हणजे तो लग्नाला असा उभा राहणार नाही".