Pushkar Jog Viral Post : मराठी सिनेसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. एकापेक्षा एक 'जबरदस्त' चित्रपट देऊन त्याने चाहत्यांच्या मनावर आपलं नाव कोरलं. शिवाय 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वात अभिनेता पुष्कर जोग सहभागी झाला होता. या कार्यक्रमामुळे त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. सध्या तो 'धर्मा- द एआय स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पुष्कर कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. अभिनेता पुष्कर जोग हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
चित्रपट म्हणजे एकीकडे प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजन करणारे माध्यम. एक काळ असा होता की विनोदी किंवा सासू-सुनांच्या भांडणाच्या विषयांपर्यंतच मराठी चित्रपट सीमित होता. मात्र, कालपरत्वे त्यात बदल होत गेला. त्यानंतर प्रेक्षकांच्या चित्रपटांकडे पाहण्याच्या मनोरंजनात्मक मानसिकतेत काही प्रमाणात परिवर्तन होत गेल्याचं पाहायला मिळालं. त्यावर आता या मराठमोठ्या अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य केलं आहे.
पुष्करने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये अभिनेत्याने लिहलंय, "महाराष्ट्र बॉलिवूडचा गड आहे हे बॉलिवूडला पण माहिती आहे. पण, याचा फटका मराठी फिल्म्सला शंभर टक्के बसतो. त्यावर इंग्लिश फिल्म्स, साऊछ इंडियन फिल्म्स. एका मराठी माणसाने फिल्म इंडस्ट्री सुरू केली, तरीही आम्हाला झिडकारल्या सारखी वागणूक नेहमीच मिळते. त्यात दुर्दैव म्हणजे याचा कोणी विचार करत नाही".
पुढे पुष्करने म्हटलंय, "प्रेक्षकसुद्धा मराठी मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतात. नवीन दिला तर थिएटरमध्ये जात नाहीत आणि स्टॅंडर्ड दिला की त्यावर टीका करतात". अशाप्रकारे अभिनेत्याने त्याच्या मनातील भावनांना वाव देत खंत व्यक्त केली आहे.