Riteish Deshmukh : उद्योगपती रतन टाटा(Ratan Tata) यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय नेत्यांसह उद्योगजगत भावुक झाले आहे. यासोबतच मनोरंजनविश्वातील कलाकार मंडळी या सर्वांनीच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अशातच मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने( Riteish Deshmukh) रतन टाटा यांच्याबरोबर २०१२ मध्ये घडलेला एक किस्सा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
२०१२ मध्ये रितेश-जिनिलिया त्यांच्या लग्नानंतर हनीमूनसाठी रोमला गेले होते. तिथे त्यांची रतन टाटा यांच्यासोबत पहिल्यांदाच भेट झाली होती. तेव्हा टाटा यांची भेटीने रितेशला खूप मोठी शिकवण दिली शिवाय कशा पद्धतीने त्यांनी तो भेटीचा प्रसंग अविस्मरणीय केला याबद्दल त्याने पोस्टद्वारे सांगितलं आहे.
या पोस्टमध्ये रितेशने लिहलंय, "२०१२ मध्ये मी आणि जिनिलिया आमच्या लग्नानंतर हनीमूनसाठी रोमला गेलो होतो. त्यावेळी हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी बसलो असताना आमच्यासोबत एक प्रसंग घडला. जो कायम स्मरणात राहिल. त्यादरम्यान जिनिलियाने हळूच मला खुणावलं. तेव्हा आमची नजर पलिकडच्या एका खोलीकडे गेली, तिथे रतन टाटा होते. माझ्या वडिलांचे आणि रतन टाटा यांचे फार जुने मैत्रीचे संबंध होते पण, मला त्यांना भेटण्याचा योग कधीच आला नव्हता. मग मी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. पण, मी काही बोलण्याआधीच ते हसतमुखाने म्हणाले हॅलो रितेश, असं म्हणत त्यांनी माझं स्वागत केलं".
काय म्हणाले रतन टाटा?
पुढे अभिनेत्याने लिहलंय, "तेव्हा रतन टाटा यांनी आमच्या लग्नाला न येण्याचं कारणही सांगितलं आणि त्याबद्दल माझी माफी मागितली. त्यांचा हा स्वभाव पाहून मी भारावून गेलो. त्यांचं हे वागणं या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव करून देतं की, ते खूपच नम्र, विचारवंत आणि दयाळू स्वभावाचे होते. शिवाय जिनिलिया सुद्धा माझ्यासोबत आहे असं मी बोलताना त्यांना सांगितलं. त्यावेळी त्यांनी ती कुठे आहे? अशी चौकशी केली. मग मी जिनिलियाकडे पाहिलं आणि तिला बोलावलं, पण ती आमच्याकडे येण्याआधी ते स्वत: बसल्या जागेवरून उठले आणि तिला भेटण्यासाठी पुढे आले. "एखाद्या स्त्रीला भेटण्यासाठी स्वत: पुढे जा. त्यांचे ते शब्द कुठेतरी खोलवर माझ्या मनामध्ये कोरले गेले. रतन टाटा यांच्यासोबत घडलेली त्या भेटीतून त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख झाली. आज इतकी वर्षे उलटूनही त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मिस्टर टाटा, तुम्ही लेजेंड आहात. तुमचे विचार, व्यक्तिमत्व येणाऱ्या पिढीला कायम प्रेरणा देईल.