Subhodh Bhave : मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे सुबोध भावे. वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटकांमध्ये काम करून त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनयाव्यतिरिक्त सुबोध भावे त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. नुकतीच अभिनेत्याने 'कॉकटेल स्टुडिओ'ला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान त्याने विविध गोष्टींचा उलगडा केला.
या मुलाखतीत सुबोध भावेला एक प्रश्न विचारण्यात आला. स्वत: च्या कामावर एवढी श्रद्धा असताना ऐतिहासिक चित्रपट न करण्याचा निर्णय घेण्याची वेळ का आली? या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, "ऐतिहासिक भूमिका करणार नाही कारण मला असं वाटतं की ती पचवण्याची क्षमता आपल्याकडच्या प्रेक्षकांमध्ये नाही. शिवाय माझ्या एखाद्या भूमिकेवरती कुठल्याही जाती-धर्माच्या अॅगलने प्रेक्षकांनी माझी भूमिका बघावी असं मला मनापासून वाटत नाही. कारण माझी कला तुमच्या बुद्धीमत्तेपेक्षा खूप वेगळी आहे. माझ्यातील कलाकार छोटा असेल पण ज्या कलेसाठी मी काम करतोय ती कला तुमच्यापेक्षा खूप मोठी आहे, आणि त्या कलेचा अपमान मी सहन करू शकत नाही. त्यामुळे ऐतिहासिक व्यक्तिरेखा नाही केली तर माझं कुठेही अडणार नाही. कारण ऐतिहासिक व्यक्तिरेखा करायची म्हणून माझा जन्मही झालेला नाही; आणि ते काही माझ्या अभिनयाचं शेवटचं स्थान नाही आहे".
पुढे अभिनेता म्हणाला, "छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपल्या वाट्याली आली. मला असं वाटतं ज्यांच्यावरती आपण मनापासून सगळेजण प्रेम करतो त्या व्यक्तीला त्यांच्या कपड्यांमधून स्पर्श करता आला, त्याचं दर्शन झालं माझ्यासाठी हा त्यांचा आशीर्वाद आहे असं मी समजतो. यापुढे ऐतिहासिक चित्रपटात काम करणार नाही, कारण मला असं वाटतं सातत्याने काम करत असताना याला काय वाटेल? त्याला काय वाटेल? याचा आपण विचार करतो. मला असं वाटतं, माझ्यासाठी लेखक आणि दिग्दर्शक ही दोन माणसं महत्वाची आहेत. कारण माझ्या लेखकाने काय लिहलंय आणि दिग्दर्शकाने काय ठरवलंय? यांच्यापलिकडे मी तिसऱ्या व्यक्तीला जास्त महत्व देत नाही. त्यामुळे तिसरा माणूस जेव्हा माझ्या कामामध्ये यायला लागतो, तेव्हा ते काम केलं नाही तर मला जास्त आनंद मिळेल".