Sushant Shelar: मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून सुशांत शेलारकडे (Sushant Shelar) पाहिलं जातं. 'दुनियादारी', 'क्लासमेट', 'मॅटर' आणि 'धर्मवीर' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून काम करून अभिनेता घराघरात पोहोचला. सुशांत शेलार अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहे. सुशांत हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाचा कार्यकर्ता आहे. शिवसेना सचिव आणि शिव चित्रपट सेना अध्यक्ष ही दोन पदं सध्या तो सांभाळत आहे. दरम्यान,आज शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिनेत्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता सुशांत शेलार याने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिलाय. या पोस्टमध्ये मा.बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा खास फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलंय, "बालपणापासून “माझ्या जमलेल्या तमाम हिंदु बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो” हे वाक्य कानावर पडले की अंगावर शहारा यायचा. भगवा किंवा पांढरा परिधान, गळ्यात रुद्राक्षाची माळ, आणि डोळे दिपवून टाकणारे तेज. फक्त ‘साहेब’ म्हटलं की डोळ्यासमोर ही प्रतिमा आजही येते. जेव्हा बाळासाहेबांना पहिल्यांदा भेटलो आणि त्यांनी पाठीवरती कौतुकाची थाप मारली त्याच दिवशी आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. तेव्हाच ठरवलं होतं की, हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सदैव सोबत घेऊन चालायचं मग त्यासाठी कुठलाही त्याग करावा लागला तरी चालेल."
पुढे सुशांत शेलारने लिहिलंय, "म्हणून आजवर आदरणीय साहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आहे.आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, आज सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आहेत.हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन “विजयोत्सव” म्हणून यावर्षी साजरा करीत आहोत. साहेबांचा धगधगता हिंदुत्ववादी विचार जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू." अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.