ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - मराठी सिनेमा खूप भरभराटीत आहे, असे सध्या सगळीकडे समजलं जातेय. पण हे खरे नाही. हे एक मोठे मिथ आहे. मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठच फिरविली आहे. मराठी प्रेक्षक जर पुन्हा मराठी सिनेमाकडे आला नाहीत तर एका वर्षांत मराठी सिनेमा मरेल,त्याला मुठमाती द्यावी लागेल, अशी खंत ज्येष्ठ चित्रपटकर्मी महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे.
हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे केवळ महाराष्ट्रातच समजले जाते. दक्षिणेत हिंदीपेक्षा त्यांच्या भाषेतील चित्रपट पाहिले जातात. हिंदी चित्रपटांना मिळालेल्या उत्पन्नापैकी जवळपास एक तृतियांश उत्पन्न महाराष्ट्रातून मिळते. ‘दंगल’चा साडेतीनशे कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. त्यातले १२० कोटी महाराष्ट्रातून आले. त्या प्रेक्षकांना मराठी सिनेमाकडे आणणे फार गरजेचे आहे. त्यांना मराठी सिनेमाची गोडी लावणे गरजेचे आहे. दक्षिणेकडे त्यांच्या भाषेचे जसे प्रेम आहे, तसे आपल्याकडे निर्माण होणे गरजेचे आहे, असे मांजरेकर म्हणाले.
आपले निर्माते एकमेकांचे पाय खेचतात अशीही खंत व्यक्त करून मांजरेकर म्हणाले, ‘‘एखादा सिनेमा आल्यावर तो कोणत्या निर्मात्याचा किंवा दिग्दर्शकाचा आहे, हे न पाहता सगळ्यांचा आहे, ही भावना निर्माण व्हायला हवी. मराठी चित्रपटांची संख्याही कमी व्हायला हवी. सध्या वर्षाला ६०ते ७० चित्रपट येतात. त्यातले अनेक प्रदर्शितच होत नाहीत. डब्यात पडून राहतात.
त्यांचा उपयोग काय? मर्यादित प्रमाणात सिनेमे बनले पाहिजेत. नव्या निर्मात्यांना कोणीतरी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्याला समजून सांगायला हवे की तुला वाटते तसे ‘रोजी पिक्चर’ नाहीए. त्याला रिस्क फॅक्टर समजून सांगायला हवेत. सध्या शंभर लोक शंभर सिनेमे काढतात. त्यापेक्षा शंभर लोकांनी एकत्र येऊन ४० सिनेमे काढले तर मराठी चित्रपटाचे बजेटही वाढेल. ‘बाहुबली’सारखा प्रादेशिक भाषेला चित्रपट साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून बनविला जातो. आपल्याकडे मात्र साडेतीन कोटीचा चित्रपट बिग बजेट ठरतो.
मांजरेकर म्हणाले, ‘‘ आपल्याकडे ‘टॅलेंट’ची कमतरता नाही. प्रत्येक राष्ट्रीय चित्रपटात मराठी सिनेमा बाजी मारतोय. मग नक्की चुकतेय कोठे?‘कासव’सारख्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळून तीन आठवडे उलटून गेले तरी तो प्रदर्शित होऊ शकला नाही. निर्मात्यांना एकत्र येऊन का यावर काही करावेसे वाटत नाही. आपली बेटे तयार झाली आहेत. संघटित कोणीच नाही.’’