'१०वी' इयत्तेच्या आठवणींना लवकरच मिळणार उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 07:51 PM2019-01-04T19:51:52+5:302019-01-04T19:53:27+5:30
१० वीच्या परीक्षेवर चौफेर भाष्य करणारा एक मराठी चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नावदेखील आहे ‘१० वी’.
सध्या एसएससी म्हणजेच १० वीच्या परीक्षेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थी आणि त्यांचे आई-वडील ताणतणावात वावरताना दिसतात. शालेय जीवनाचा परमोच्च बिंदू असलेल्या १० वीच्या परीक्षेला मुलांच्या आयुष्यातील पहिला मैलाचा दगड समजला जाते. याच १० वीच्या परीक्षेवर चौफेर भाष्य करणारा एक मराठी चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नावदेखील आहे ‘१० वी’. हा चित्रपट प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत बघणे गरजेचे आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.
जरी १० वी ची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील मैलाचा दगड असला तरीही त्यावेळी येणाऱ्या टेंशन्सचा व कदाचित त्यातून येणारा नैराश्याचा कसा सामना करता येऊ शकेल याचा सर्वांगीण विचार ‘१० वी’ चित्रपटातून करण्यात आला आहे.
या चित्रपटाची कथा, पथकथा आणि संवाद मयूर राऊत आणि पियुष राऊत यांचे असून या दोघांनीही या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. निर्माते सुधीर जाधव यांनीच ‘१० वी’ प्रस्तुतसुद्धा केला आहे. देवेंद्र अरोडा हे सहनिर्मात्याच्या भूमिकेत आहेत. रविराज पवार व आकाश पवार यांच्या गीतांवर अरुण चिल्लारा, आकाश पवार आणि ऐश्वर्य मालगावे यांनी संगीतसाज चढविला आहे. छायांकन मनोज सी कुमार यांचे असून पराग खाऊण्ड यांनी संकलकाची भूमिका पार पाडली आहे. या चित्रपटाचा पोस्टर पाहिले असता हे ध्यानात येते की सर्व कलाकारांचे चेहरे लपविले आहेत. थोडक्यात सर्वच कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेऊन निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. पालक आणि पाल्यांच्या १० वीच्या टेन्शनचा खात्मा करण्यासाठी मयूर राऊत व पियुष राऊत दिग्दर्शित ‘१० वी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.