Join us

'11 ऑपरेशन्स अन् हाडांची मोडतोड'; प्रसिद्ध मराठी अभिनेता 10 वर्षांपासून पार्किन्सन्स आजाराने त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 3:28 PM

Rajan patil : दोन वर्षांपूर्वी त्यांनी मरण यावं अशी इच्छा व्यक्त केली होती.

मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी जीवनात अनेक चढउतार पाहिले. परंतु, कितीही वादळ, संकटं आली तरीदेखील ते त्या वादळात पाय घट्ट रोवून उभे राहिले. असंच काहीसं लोकप्रिय ज्येष्ठ मराठी अभिनेता राजन पाटील यांच्या बाबतीत घडलं. नुकतंच त्यांनी ७१ व्या वर्षात पदार्पण केलं. परंतु, वयाची एकाहत्तरी गाठपर्यंत त्यांनी पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये अनेक चढउतार पाहिले. इतकंच नाही तर दोन वर्षांपूर्वी ते आजारपणाला इतके कंटाळले होते की त्यांनी मरण यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. 

राजन पाटील यांनी मराठी कलाविश्वात अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वात त्यांना मानाचं स्थान आहे. सिनेसृष्टीत यशस्वीपणे काम करणारे राजन पाटील मध्यंतरी त्यांच्या शारीरिक दुखण्यामुळे प्रचंड त्रस्त झाले होते. यावेळी मला मरण यावं असंही त्यांनी म्हटलं होतं. परंतु, चाहत्यांनी त्यांना प्रचंड धीर दिला. परंतु, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या दुर्धर आजाराची करुण कहानी सांगितली आहे.

काय म्हणाले राजन पाटील?

"राजन पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी त्यांच्या आजारपणाची माहिती दिली. "टाइम्स मधील नोकरी गेल्यानंतर मी माझ्या आवडत्या अभिनय क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. सुदैवाने लोकांनी मला अभिनेता म्हणून स्वीकारले. डॉ. लागू, प्रा. मधुकर तोरडमल, विक्रम गोखले, अशा मोठ्या रंगकर्मी बरोबर काम करून त्यांची शाबासकी मिळवली. रसिकांचं उदंड प्रेम मिळालं, ज्याचं मोल नाही करता येणार. या व्यवसायाने मला प्रसिद्धी मिळाली. मराठी दूरदर्शन मालिकांमुळे मी लोकांच्या घराघरात पोहचलो. स्टार नाही झालो पण सुजाण, संवेदनशील अभिनेता म्हणून माझी ओळख निर्माण झाली. आणखी काय हवं !", असं राजन पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "आयुष्याच्या या प्रवासात माझ्या प्रकृतीवर खूप आघात झाले. गूढ ( ज्याचं कारण किंवा नाव मला अद्यापही माहीत नाही ) आजार,पोलिओ, टायफॉइड,कॅन्सर, अनेक रस्ता अपघातांमुळे झालेली हाडांची मोडतोड अशा अनेक आजारांशी लढलो आणि त्यांना पिटाळून लावले. आतापर्यंत माझी अकरा ऑपरेशन्स झाली आहेत. म्हणजे गंमत बघा मी फक्त नाटकाच्या थिएटरवर प्रेम केलं असं नाही तर तितकेच प्रेम ऑपरेशन थिएटर वर सुद्धा केले. आता गेली दहा वर्षे मी पार्किन्सन्स या आजाराशी लढतोय. लढाई कठीण आहे. पण लढणे हा माझा हक्क आहे, माझा स्वभाव आहे. या लढाईत तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची मला गरज आहे. त्या तुमच्याकडून मिळतील याची मला खात्री आहे. गेली तीन वर्षं माझ्या अभिनयाच्या क्षेत्रापासून मी दूर आहे. पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी माझी अवस्था झालीय. पुन्हा कार्यरत होण्याची जबरदस्त इच्छा आहे. बघुया ..." 

टॅग्स :मराठी अभिनेतासिनेमासेलिब्रिटी