Join us

२५ रुपयांमध्ये २५वा प्रयोग! पुलंच्या 'एक झुंज वाऱ्यासाठी' नाटकाकरीता रंगकर्मींनी कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 4:32 PM

पु. ल. देशपांडे लिखित 'एक झुंज वाऱ्याशी' हे नव्या संचात रंगभूमीवर आलेले नाटक मागील बऱ्याच दिवसांपासून रसिकांना खुणावत आहे.

संजय घावरे

पु. ल. देशपांडे लिखित 'एक झुंज वाऱ्याशी' हे नव्या संचात रंगभूमीवर आलेले नाटक मागील बऱ्याच दिवसांपासून रसिकांना खुणावत आहे. २५ ऑगस्ट आणि २५वा प्रयोग हा योगायोग साधत हे नाटक अवघ्या २५ रुपयांमध्ये रसिकांना दाखवण्याचे आव्हान या नाटकाच्या टिमने स्वीकारले असून, यासाठी त्यांनी स्वत:च्या खिशाला चाट दिली आहे.

रशियन नाटककार वलादलीन दोझोर्त्सेवच्या ‘द लास्ट अपॉइंटमेंट’ या नाटकाचे रुपांतर पु. ल. देशपांडे यांनी १९८६मध्ये ‘एक झुंज वार्‍याशी’ नावाने केले होते. यात दिलीप प्रभावळकर, सयाजी शिंदे आणि वसंत सोमण यांनी काम केले होते. रविवार २५ ऑगस्टला रात्री ८;३० वाजता रविंद्र नाट्य मंदिरामध्ये 'एक झुंज वाऱ्याशी' या नाटकाचा नवीन संचातील प्रयोग केवळ २५ रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे. २५ ते २९ असे सलग पाच दिवस या नाटकाचे पाच प्रयोग करण्याची योजना आखण्यात आली आहे. याबाबत 'लोकमत'शी बोलताना लेखक-दिग्दर्शक-अभिनेते श्रीनिवास नार्वेकर म्हणाले की, पंचविसााव्या प्रयोगातून किती पैसे जमा होतील याचा विचारच केलेला नाही. फक्त पंचविसावा प्रयोग २५ रुपयांमध्ये दाखवायचा हा एकच ध्यास आहे. २५ प्रयोगांनंतर हे नाटक थांबणार नसून, ३१ प्रयोगांचे प्लॅनिंग तयार आहे. या नाटकात प्रभावळकरांची भूमिका मी केली असून, सयाजीने साकारलेली व्यक्तिरेखा आशुतोष घोरपडे साकारत आहेत, तर सोमणांनी केलेली भूमिका दीपक करंजीकर आणि सुगत उथळे आलटून-पालटून करत आहेत. विनोदी लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या पुलंचे हे नाटक गंभीर आहे. त्यामुळे अभिनय-दिग्दर्शनापासून तंत्रज्ञांपर्यंत सर्वांसाठीच हे मोठे आव्हान आहे. पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात याचा शुभारंभ करण्यात आला. भारंगममध्ये राष्ट्रीय नाट्य महोत्सवात दिल्लीत प्रयोग झाला. संगीत नाटक अकादमीच्या महोत्सवातही प्रयोग झाला.

आर्थिक डोलारा मोठा...या नाटकाकडे जरी प्रायोगिक नजरेतून बघितले जात असले तरी याला सेमिमकमर्शिअल टच दिला आहे. त्यामुळे एका प्रयोगासाठी ५० ते ५५ हजार रुपये खर्च येतो. पंचवीसाव्या प्रयोगासाठी सर्व कलाकारांनी स्वत:च्या खिशात हात घातला आहे. २५व्या प्रयोगसाठी सध्या ५० टक्के बुकिंग झाले आहे.

नेमकी झुंज कोणाशी?एका व्यक्तीवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारुन न्याय मागण्यासाठी एक सर्वसामान्य माणूस थेट मंत्र्याच्या केबिनमध्ये घुसून त्यांचा राजीनामा मागतो. सर्वसामान्य माणसाला प्रश्न विचारण्यासाठी व विचार करण्यासाठी हे नाटक प्रवृत्त करते. 'मी' आणि 'मी' यातला कॅान्फ्लेक्ट यात आहे.