मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कित्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इत्यादी ही त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुद्ध मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून वस्त्रहरण हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले. मराठी रंगभूमीवर माईल स्टोन ठरलेले 'वस्त्रहरण' हे विक्रमी मालवणी नाटक पुन्हा रंगभूमीवर अवतरणार असल्याची माहिती निर्माते प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
'देवबाभळी'च्या दिंडी या अनोख्या प्रयोगाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला कांबळी यांच्यासोबत अभिनेत्री शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी, लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, सूत्रधार गोट्या सावंत, विजय पाध्ये, जयप्रकाश जातेगावकर आदी मंडळी उपस्थित होती. 'संगीत देवबाभळी' या नाटकाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर ९ मार्चपासून 'देवबाभळी'ची दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात जागर करणार असल्याचे प्रसाद कांबळी म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी 'वस्त्रहरण' हे विक्रमी मालवणी नाटक पुन्हा रंगभूमीवर अवतरणार असल्याचे सांगितले.
१६ फेब्रुवारी १९८० साली दिवंगत अभिनेते मच्छिन्द्र कांबळी यांनी वस्त्रहरण या नाटकाचा पहिला प्रयोग केला. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेली वस्त्रहरण ही अजरामर कलाकृती येत्या १६ फेब्रुवारी रोजी ४४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर करणार असून लवकरच प्रयोग क्र. ५२५५ रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर होणार असल्याचे प्रसाद कांबळी यांनी सांगितले.