कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली. या वर्षी कंगना रणौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मनोज वाजपेयी आणि धनुषने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. छिछोरे हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर बार्डो हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला.
बार्डो या चित्रपटातील गाण्यासाठी सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला. बार्डो हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंजली पाटील, गिरीश परदेशी, अशोक परदेशी यांसारख्या नामांकित मराठी कलाकारांनी काम केलं आहे. रितू फिल्म्स कट प्रोडक्शन व पांचजन्य प्रोडक्शन प्रा.लि यांच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसला तरी या चित्रपटाचे समीक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. जीवनाच्या प्रवासात इच्छितस्थळी पोहोचताना घडणाऱ्या गंमती जंमती या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
आनंदी गोपाळला राष्ट्रीय पुरस्कारात सामाजिक प्रश्नांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला तर राष्ट्रीय इंटर्गेशनवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार ताजमहालला मिळाला. प्रसाद ओकच्या पिकासू आणि लता भगवान करे या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट स्पेशल मेन्शन हे पुरस्कार मिळाले.