68th National Film Awards: ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यांमध्ये साऊथ, बॉलिवूड चित्रपटांसह मराठीतील 'गोष्ट एका पैठणीची' (goshta eka paithanichi) या चित्रपटानेही बाजी मारली आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून 'फनरल' या चित्रपटाला गौरविण्यात आले. यावर फनरल सिनेमाचे लेखक आणि निर्माते रमेश दिघे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
''२०१० पासून सुरू असलेली धडपड, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलेला रिसर्च, सिनेनिर्मितीची किंवा लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना समोर येणाऱ्या संकटांतून मार्ग काढत इथपर्यंत पोहोचलो आहे. तळमळीने केलेल्या कामाचे सार्थक झाले. आपला सिनेमा आईने बघावा आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या गोष्टी सांगाव्यात या हेतूने 'फनरल' बनवला. मित्रांनी केलेला सपोर्ट आणि सिनेनिर्मितीच्या वाटेत भेटलेल्या काही शुभचिंतकांमुळे हे शक्य होऊ शकले. ही प्रोसेस खूप अवघड होती, तरीही आमच्या संपूर्ण टिमने एन्जॉय करत चित्रपट पूर्ण केला, असं रमेश दिघे म्हणाले.
फनरलमधून ‘कसं जगायचं’ याचा वेगळा दृष्टीकोन या चित्रपटाने दिलाय पण जगण्यासोबत मृत्युलाही किती आनंदाने, समाधानाने सामोरं जाता येऊ शकतं त्याचा अत्यंत प्रत्ययकारी अनुभव या चित्रपटातून देण्यात आला आहे. फनरल चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली होती. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये फनरल गौरवण्यात आले आहे.