70th National Film Awards: 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये मराठी सिनेमांनीही आपली मोहर उमटवली आहे. परेश मोकाशींचा 'वाळवी' हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरचा गडी दिग्दर्शक, निर्माता सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या 'वारसा' या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट कॅटेगरीत पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोल्हापूरचे सचिन सूर्यवंशी यांच्या 'वारसा' या माहितीपटात छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन सुरु झालेल्या मर्दानी खेळाचे स्वरुप आणि एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणारा हा मर्दानी खेळाचा वारसा सुंदररित्या मांडला आहे. प्रत्येकाने अभिमानाने बघावा असा हा माहितीपट आहे. सचिन सूर्यवंशी यांच्या या माहितीपटाची राष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली असून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी स्वत:च माहितीपटाचं दिग्दर्शन आणि निर्मीतीही केली आहे. सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपट या कॅटेगरीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे.
सचिन सूर्यवंशी यांच्या 2019 साली आलेल्या 'द सॉकर सिटी' या सिनेमालाही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. नंतर २०२२ साली त्यांना 'वारसा' साठी दुसऱ्यांदा फिल्मफेअर मिळाला. आणि आता थेट राष्ट्रीय पुरस्काराला त्यांनी गवसणी घातली आहे. विशेषकरुन कोल्हापूरकरांना सचिन सूर्यवंशी यांचा अत्यंत अभिमान वाटत आहे. 'वारसा' हा माहितीपट युट्यूबवर उपलब्ध आहे.