70th National Film Awards: ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन या चित्रपट निर्मात्यांचा गौरव केला जातो. यंदा परेश मोकाशी यांच्या 'वाळवी' सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी 'वाळवी' या सिनेमाची निवड करण्यात आली आहे.
'वाळवी' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनेत्री आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णीने पोस्ट केली आहे. केवळ 'वाळवी' सिनेमालाच नाही तर परेश मोकाशी यांच्या आणखी दोन सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. याआधी 'एलिझाबेथ एकादशी' आणि 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या दोन सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. याबाबत मधुगंधाने पोस्ट शेअर केली आहे.
"परेश आणि मी आम्ही एकत्र केलेल्या चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांची हट्रिक! १. हरिश्चंचंद्राची फॅक्टरी- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट २. एलिझाबेथ एकादशी - सर्वोत्कृष्ट चित्रपट ३. वाळवी - सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट...टीम वर्क आणि विधात्याची कृपा!", असं मधुगंधाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनंदन केलं आहे. वाळवी हा सिनेमा १३ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.
दरम्यान, यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांमध्ये ३ मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. वाळवीबरोबरच आणखी दोन मराठी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मरमर्स ऑफ द जंगल या मराठी सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवॉर्ड मिळाला आहे. तर वाली या सिनेमाला मराठीतील बेस्ट फिचर फिल्मचा अवॉर्ड घोषित करण्यात आला आहे.