70th National Film Awards: ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येतं. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात. गेल्या वर्षी एकदा काय झाले या मराठी सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. यंदा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी 'वाळवी' या सिनेमाची निवड करण्यात आली आहे. 'आणखी एक मोहेनजोदारो' या सिनेमाला बेस्ट बायोग्राफिकल हिस्टोरिकल कम्पायलेशन फिल्म कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला आहे.
परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असलेल्या 'वाळवी' सिनेमाला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांमध्ये तीन मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. 'वाळवी'बरोबरच आणखी दोन मराठी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 'मर्मर्स ऑफ द जंगल' या मराठी सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवॉर्ड मिळाला आहे. 'वारसा' या माहितीपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
दरम्यान, 'वाळवी' हा सिनेमा १३ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.