मराठी कलाविश्वात असे अनेक सिनेमे आणि गाणी आहेत जी कितीही गाजली असली तरीही काही काळानंतर प्रेक्षक त्यांना विसरून जातात. पण तुम्हाला मराठीतलं शांताबाई हे गाणं आठवतयं का... २०१५ साली रिलीज झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हे गाणं इतकं फेमस झालं की या गाण्याने आजपर्यंत तब्बल ८५० मिलियन व्ह्युज मिळवलेत. हे गाणं गायक संजय लोंढे (Sanjay Londhe) यांनी गायलंय. विशेष म्हणजे हे गाणं इतकं प्रसिद्ध असूनही या गाण्याच्या गायकाला मराठी तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीकडून वगळण्यात आले. याचं कारण संजय लोंढे हे पुण्यातील एका गरीब वस्तीत राहतात असे समजले जाते. पण आता संजय लोंढे पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. ते म्हणजे आमदार निवास (Aamdar Nivas Movie) या मराठी सिनेमातून.
आमदार निवास या सिनेमाचे निर्माते-दिग्दर्शक संजीवकुमार राठोड (Sanjeev Kumar Rathod) यांनी संजय यांच्यासोबत या सिनेमाच्या गाण्यांचा कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतल्याची माहिती संजय यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. संजय यांनी स्वतः याचे काही फोटो आणि संजय यांच्यासोबतचा एक व्हि़डीओ शेअर करत याची माहिती दिलीये. त्यामुळे शांताबाईनंतर आता संजय यांच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीत पाहायला मिळणार आहे.