Join us

सुटट्यांमध्ये २० मराठी सिनेमांची मेजवानी!

By संजय घावरे | Published: April 09, 2023 5:00 PM

शुक्रवारी रिलीज होणार सहा मराठी सिनेमे; 'किसी का भाई किसी की जान'समोर कोणी नाही

संजय घावरे

 मार्च महिन्यातील परीक्षांच्या काळात दोनच मराठी चित्रपट रिलीज झाले होते. आता सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाल्याने एप्रिल-मे महिन्यांमध्ये जवळपास २० मराठी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या जोडीला सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'किसी का भाई किसी की जान'सोबत इतरही हिंदी सिनेमे आणि पाच मराठी नाटकेही रंगभूमीवर आल्याने यंदाच्या सुट्ट्यांमध्ये रसिकांना जणू मनोरंजनाची मेजवानीच मिळणार आहे

शाळांना सुट्टी पडली की पूर्वी गावी जाण्याचे वेध लागायचे. 'मामाच्या गावा जाऊ या...' असे म्हणत दीड-दोन महिने बच्चे कंपनींचा मुक्काम गावी असायचा, पण अलिकडच्या काही वर्षांमध्ये सुट्टीतील मनोरंजनाची गणिते बदलली आहेत. अॅडव्हान्स कोर्सेस, रिसॅार्ट पिकनीक आणि विविध शिबिरांच्या प्लॅनिंगमध्ये मराठी-हिंदी सिनेमांसोबतच नवीन नाटके रसिकांचे लक्ष वेधत आहेत. मागच्या शुक्रवारी 'घर बंदूक बिरयानी' आणि 'सर्किट' या मराठी चित्रपटांसोबत 'गुमराह', 'ऑगस्ट १६ १९४७' हे हिंदी चित्रपटही रिलीज झाले आहेत. येत्या शुक्रवारी जवळपास अर्धा डझन मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत. यात 'जैतर', 'सर्जा', 'उर्मी', 'स्कूल कॅालेज आणि लाईफ', 'जुगाड्या', 'बबली' हे सिनेमे आहेत. यासोबत 'शाकुंतलम', 'छिपकली', 'बायसीकल डेज', 'सर मॅडम सरपंच', 'पिंकी ब्युटी पार्लर' हे चित्रपटही आहेत. २१ एप्रिलला सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' रिलीज होणार असल्याने मराठी चित्रपटांनी माघार घेतली आहे. २८ एप्रिलला 'पीएस २' आणि 'बॅड बॅाय'सोबत 'महाराष्ट्र शाहीर', 'टिडीएम', 'वाळू माफिया' हे मराठी सिनेमे रिलीज होतील.

मे महिन्यात १० मराठी चित्रपट रसिकांचे मनोरंजन करणार आहेत. ५ मे रोजी 'मराठी पाऊल पडते पुढे', 'तेंडल्या', 'सरी', 'बटरफ्लाय', १२ मे रोजी 'रावरंभा', 'चौक', १९ मे रोजी 'रघुवीर', 'फकाट', 'गेट टुगेदर', २६ मे रोजी 'मुसंडी' असे १० मराठी चित्रपट रिलीज होतील. याखेरीज आणखी एखाद-दुसरा सिनेमा अचानक रिलीजसाठी येऊ शकतो. याउलट हिंदीत मात्र 'अनवुमन', 'स्वातंत्र्यवीर सावरकर', 'आझम - राईज ऑफ अ न्यू डॅान' अशा मोजक्याच चित्रपटांच्या प्रदर्शनाची योजना आखण्यात आली आहे. एप्रिल-मेमध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची संख्या हिंदी चित्रपटांच्या तुलनेत खूप जास्त आहे. या काळात देशातील बऱ्याच भागांमध्ये वाढलेल्या तापमानाचा परिणाम सिनेमागृहांतील गर्दीवर होत नसल्याने हिंदी निर्माते चित्रपट रिलीज करणे टाळत असल्याने हे चित्र पहायला मिळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नाटकांचा षटकार...

सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता सहा नाटके रसिकांच्या सेवेत रुजू झाली आहेत. काही नाटके नुकतीच रंगभूमीवर आली असून, काही येण्याच्या तयारीत आहेत. यात 'नियम व अटी लागू', 'करून गेलो गाव', 'सुमी आणि आम्ही', 'अशीच आहे चित्ता जोशी', 'तू तू मी मी', 'गजब तिची अदा' यांचा समावेश आहे.

- केदार शिंदे (निर्माता-दिग्दर्शक)

शाहिर साबळेंवरील 'महाराष्ट्र शाहीर' २८ एप्रिलला रिलीज होणार असल्याचे एक वर्षापूर्वी घोषित केले होते. इतरांनी नंतर गर्दी केली. हे शाहीरांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने आणि १ मे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज करत आहोत. 'तू तू मी मी' हे नाटक २४ वर्षांनी परत येत असल्याने नवीन पिढीतील रसिकांना म्युझिकल-धमाल नाटक बघायला मिळेल.

- अनुप जगदाळे (दिग्दर्शक)

नेहमीच सुट्ट्यांच्या काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या जास्त असते. 'रावरंभा'च्या प्रदर्शनाचे प्लॅनिंग आम्ही अगोदरच केले होते. हा एका मावळ्याच्या प्रेमाच्या विविध पैलूंची आणि नात्यांची कहाणी सांगणारा सिनेमा आहे. इतर ऐतिहासिक चित्रपटांपेक्षा हा वेगळा असल्याने या माध्यमातून इतिहासातील मोरपंखी पान सादर करत आहोत. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीटेलिव्हिजनबॉलिवूड