लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्यावर आधारित चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून त्याचे एडिटिंग आणि डबिंग लवकरच पूर्ण होईल. यात बाबूजींची २६ गाणी आहेत. प्रत्येक गाणे एक ते दीड मिनिटांचे आहे आणि हा चित्रपट येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे, अशी घोषणा ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी रविवारी ठाण्यात केली.
ठाणे पालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती, ठाणे यांच्या वतीने गडकरी रंगायतन येथे ‘जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार’ व ‘गंगा-जमुना’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ‘जनकवी पी. सावळाराम’ पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना प्रदान करण्यात आला, तर ‘गंगा-जमुना’ पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर-गोखले यांना प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्रा. मंदार टिल्लू व उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार सानिका कुलकर्णी यांना दिला. याप्रसंगी माजी महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, जनकवी पी. सावळाराम कला समिती, ठाणे सचिव उदय पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना जोशी यांनी केले.
‘पुरस्कारामुळे क्षण उजळतात’प्रभुलकर म्हणाल्या की, एखादी भूमिका ज्या वेळेला आपल्याला नाव मिळवून देते, प्रसिद्धीच्या वलयाची जाणीव करून देते त्यावेळी त्याआधी आलेले नैराश्य, स्ट्रगल या क्षणांची आठवण होते आणि अशा पुरस्कारामुळे हे क्षण उजळून निघतात. पी. सावळाराम हे प्रत्येकाच्या मनातलं नाव आहे. माझ्या आईने लहानपणापासून त्यांच्या कवितांची मला गोडी लावली आणि आज त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळतो याचा आनंद आहे.
‘हे श्रेय रसिकांचे आहे’जनकवी पी. सावळाराम यांची गाणी अत्यंत गाजलेली आहेत. त्यांची गाणी ऐकत मी मोठा झालो, नुसती कविता लिहून चालत नाही तर त्या कवितेला स्वरांचे कोंदण असेल तर ती आपल्यासमोर येते. मला अनेकांबरोबर उत्तम संगीत करायला मिळाले याचे समाधान आहे. परंतु हे श्रेय रसिकांचे आहे. रसिकांच्या डोळ्यातील आशीर्वाद हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो, असे पुरस्काराला उत्तर देताना फडके म्हणाले.