मुंबई - मागील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघावा यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंचा प्रवास रुपेरी पडद्यावर येणार आहे. जरांगे यांच्या संघर्षावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट तयार होणार आहे.
मराठा आरक्षणाला गती मिळावी आणि लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. २९ ऑगस्टपासून त्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांचा हा संघर्ष रुपेरी पडद्याद्वारे सर्वदूर पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे पुढे सरसावले आहेत. जरांगे यांच्या हस्ते त्यांनी सराटी येथे 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. अभिनेता रोहन पाटील या चित्रपटात जरांगेंची भूमिका साकारणार आहे. पुढल्या वर्षी हा चित्रपट रिलीज करण्याची योजना आहे. सराटी या गावात 'संघर्षयोद्धा'च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. याखेरीज मुंबईसह इतर ठिकाणांवरही याचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. चित्रपटातील इतर कलाकारांची निवड लवकरच करण्यात येणार आहे.