Join us

‘कोसला’ कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 9:23 AM

Marathi Cinema: दादासाहेब फाळकेंपासून फिल्म इंडस्ट्री सुरू झाली, पण त्यांनी पेरलेले मराठीचे बीज कोणी पुढे नेले नाही. बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यासारखी मोठी व्यक्तिमत्त्वे आपल्याकडे होऊनही मराठीचे नाव जगातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही.

मंबई - दादासाहेब फाळकेंपासून फिल्म इंडस्ट्री सुरू झाली, पण त्यांनी पेरलेले मराठीचे बीज कोणी पुढे नेले नाही. बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यासारखी मोठी व्यक्तिमत्त्वे आपल्याकडे होऊनही मराठीचे नाव जगातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही. बंगाली चित्रपटांना जगभर जितका मान आहे तितका मराठीला नाही. तशी कामगिरी कोणीतरी करावी, अशी आशा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. ‘कोसला’ या गाजलेल्या कादंबरीवरील मराठी चित्रपटाच्या घोषणेप्रसंगी ते बोलत होते.

चित्रपटाच्या घोषणेच्या कार्यक्रमाला नेमाडे यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे, निर्माते मेहुल शाह, दिग्दर्शक आदित्य राठी, गायत्री पाटील, सुलेखनकार अच्युत पालव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जयदीप वैद्य यांनी गायलेल्या कबिरांच्या निर्गुणी भजनांनी झाली. 

 नेमाडे म्हणाले की, मीसुद्धा ‘कोसला’मधील ९९ लोकांपैकीच एक आहे. मला शंभरातला एक नेहमी नको असतो. ९९ हा आकडा पाहिला तर तो सारखासारखा पुढे जाणारा आहे. त्यामुळे ९९ आकडा कादंबरीत वापरला.  ९९ सारखे आपण व्हायला पाहिजे. मी चित्रपटांचाही खूप मोठा शौकीन आहे. खूप चांगले सिनेमे दाखवावे आणि पाहावे या मताचा मी आहे.  

 सयाजीमुळे जुळला चित्रपटाचा योग... सयाजी शिंदे निर्माते-दिग्दर्शकांना माझ्यापर्यंत घेऊन आले. आतापर्यंत मोठमोठ्या लोकांनी प्रयत्न केले, पण कोणालाही या कादंबरीवर सिनेमा करणे जमले नाही. त्यामुळे हे लोकही वर्षभराने थकून परत येतील असे वाटले होते, पण हे वस्ताद निघाले. यांचे काम आणि यांनी विचारलेले प्रश्न ऐकून पुढे कादंबऱ्या लिहिण्यासाठी उत्साह आला आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मराठीसिनेमा