महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे. या चित्रपटातील बऱ्याच कलाकारांचे लूक समोर आले आहेत. दरम्यान आता या चित्रपटात केसरची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा लूक समोर आला आहे. तिला या लूकमध्ये ओळखणं कठीण झालं आहे.
मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर सुभेदार चित्रपटातील लूक शेअर करत लिहिले की, हात बांधून लई मर्द बनतुया? ह.. हात सोड! मग तुला नाय मुघलांच्या सात पिढ्यांना दावते.. मराठ्यांना नडायचा नतीजा काय असतुया. मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोत तिच्या डोक्यावर पदर, कपाळावर मोठं कुंकू, नाकात नथ आणि गळ्यात कवड्याची माळ पाहायला मिळत आहे. खरेतर तिला या लूकमध्ये ओळखणंदेखील कठीण झाले आहे. मृण्मयीच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमा सोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर, कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ याचे दर्शन ‘सुभेदार’ चित्रपटात होणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा.राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, रिषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढारकर आदि मराठीतील दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. चित्रपटातील ‘मावळं जागं झालं रं’, ‘आले मराठे’, ‘हळद लागली रायबाला’ ही तीनही गाणी सध्या तुफान गाजतायेत. देवदत्त बाजी, अवधूत गांधी, सुवर्णा राठोड, रोहित राऊत, निधी हेगडे यांच्या स्वरांनी या चित्रपटातील गाणी सजली असून संगीतकार देवदत्त बाजी यांचे संगीत गाण्यांना लाभले आहे. सुभेदार चित्रपट २५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.