शिवसेनेचे नेते आणि ठाण्यात शिवसेनेला बळकट करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. दरम्यान, आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी आनंद दिघे यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी मांडला आहे. या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक यानं साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मिलिंद गवळी यानं प्रसाद ओकसाठी एक विशेष पोस्ट लिहिली आहे.
“आपल्या समाजामध्ये हिरो कोणाला म्हणावं, आदर्श कोणाला मानावं तर आनंद दिघे साहेब हे उत्तम उदाहरण आहेत आणि तू हुबेहूब आनंद दिघे साहेबांचा सारखा दिसला आहेस ( Actor Ben Kingsley Gandhi film दिसला तसा). तुझ्या अभिनयाची उंची मला माहिती आहे. त्यामुळे सिनेमा अप्रतिमच असणारच, खूप खूप खूप शुभेच्छा मित्रा. माझे मित्र प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई तुमचा सुद्धा खूप अभिमान वाटतो, हा विषय निवडला आणि त्याला तुम्ही न्याय दिलात. धर्मवीर च्या संपूर्ण टीमला माझा सलाम आणि शुभेच्छा,” असंही त्यांनी आपल्या पोस्टमधून म्हटलं आहे. त्यांनी यासोबत आनंद दिघे यांच्यासोबतच्या फोटोसह चित्रपटाचा ट्रेलरही शेअर केला आहे.