Join us

'आई कुठे काय करते' फेम अभिषेक देशमुखला मिळाला मोठा सिनेमा, बॉलिवूड अभिनेत्याबरोबर करणार स्क्रीन शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 14:36 IST

अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिषेकच्या हाती आता एक मोठा सिनेमा लागला आहे. 

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अरुंधतीबरोबरच देशमुख कुटुंबही चाहत्यांना आपलंसं वाटतं. या मालिकेत यश हे पात्र साकारून अभिनेता अभिषेक देशमुख घराघरात पोहोचला. 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे अभिषेकला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिषेकच्या हाती आता एक मोठा सिनेमा लागला आहे. 

अभिषेक देशमुख लवकरच मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आईच्या गावात मराठीत बोल' या सिनेमात अभिषेकची वर्षी लागली आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये अभिषेकची झलक पाहायला मिळाली आहे. 'आईच्या गावात मराठीत बोल' सिनेमात अभिषेक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात तो 'थ्री इडियट्स' फेम ओमी वैद्यबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. 

याआधी अभिषेक 'सनी' या हेमंत ढोमेच्या सिनेमात झळकला होता. यामध्ये त्याने ललित प्रभाकरचा मित्र म्हणजेच संतोष ही भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अभिषेक पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 

दरम्यान, 'आईच्या गावात मराठीत बोल' सिनेमात अभिषेकबरोबर पार्थ भालेराव, ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. ओमी वैद्यने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. १९ जानेवारी रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारमराठी अभिनेता