Join us

अलका कुबल यांनाही वाहण्यात आली श्रद्धांजली, शेवटी व्हिडीओ शेअर करत सांगावे लागले......

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 16:20 IST

आशालता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र कोरोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयातच त्यांचे निधन झाले.

सातारा जिल्ह्यात ‘देवमाणूस’, ‘आई माझी काळूबाई’ अशा मालिकांचे चित्रीकरण सुरू होते. ‘आई माझी काळूबाई’ या अलका कुबल यांच्या मालिकेत आशालता यांची प्रमुख भूमिका होती. त्याच मालिकेत अलका कुबल या भूमिका साकारत आहेत. मुंबईहून आलेल्या एका  डान्स ग्रुपमुळे सेटवर काहीजणांना कोरोनाची बाधा झाली. सुमारे २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते बाधित आढळल्यानंतर मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले. मात्र, आशालता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेवटी कोरोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयातच त्यांचे निधन झाले. 

 

आशालता यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर येताच अलका कुबल यांनाही कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरल्या होत्या. आशालता यांच्यासह चार दिवस अलका कुबल होत्या. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची चर्चा होती. सोशल मीडियावर अलका कुबल यांचीही मृत्युची अफवा पसरली. काहींनी तर बातमीची शहानिशा न करताच त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली.

 

चाहत्यांमध्ये पसरलेल्या संभ्रमामुळेच शेवटी  कुबल यांनी स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओत त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असून त्यांना कोरोनाची लागण झाली नाही.  त्या सुखरूप आहेत. काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की, रसिक प्रेक्षकहो तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत. मी ठीक आहे आणि आमचं युनिट पुन्हा एकदा शूटिंगसाठी सज्ज झालंय. सर्वांची करोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तुमचा पाठिंबा असाच राहू द्या म्हणत आभार मानले आहेत. 

माझं शेवटचं सगळं तू करायचं... 

अलका कुबल यांनी स्वत: सांगितल्यानुसार, आशालता त्यांच्या कुटुंबावर काहीशा नाराज होत्या. रागावल्या होत्या. त्यामुळे अखेरच्या क्षणी माझं शेवटचं सगळं तू आणि समीरनेच करायचं, असे आशालता यांनी अलका कुबल यांना सांगून ठेवले होते. त्यानुसार अलका व समीर यांनी त्यांच्या इच्छेचा मान राखून सगळे सोपस्कार पार पाडले, कोरोना आणि सरकारी नियमांचे पालन करून साता-यात आशालता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवटच्या क्षणापर्यंत सोबत होत्या अलका कुबल 

आशालता रूग्णालयात असताना अलका कुबल व त्यांचे पती त्यांच्यासोबत होते. रूग्णालयात त्यांना कोरोना वार्डात ठेवले होते. केवळ काचेतून त्यांना बघता येत होते. याचदरम्यान अलका कुबल त्यांना केवळ काचेतून बघत होत्या. पण एक क्षण त्यांना राहावले नाही, मला आत जाऊ द्या, म्हणून त्यांनी डॉक्टरांना विनंती केली. अखेर डॉक्टरांनी त्यांना पीपीई किट घालून आशालता यांना आत जावून भेटण्याची परवानगी दिली आणि अलका आत गेल्या. यावेळी मला भूक लागली, असे आशालता अलका यांना म्हणाल्या. अलका यांनी त्यांना सात आठ घास पुलाव भरवला, पाणी पाजले. ती अलका व आशालता यांची अखेरची भेट ठरली...

टॅग्स :अलका कुबल