Join us  

मराठ्यांचा नवा सरदार! 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर प्रदर्शित, बॉलिवूड अभिनेता मनोज जरांगेंच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 2:41 PM

'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेता मनोज जरांगेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या जीवनावर आधारित आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'आम्ही जरांगे' असं या सिनेमाचं नाव असून यातून जरांगेचा जीवनपट मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. नुकतंच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेता मनोज जरांगेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

काही महिन्यांपूर्वीच 'आम्ही जरांगे' या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमात मनोज जरांगेंच्या भूमिकेत कोण दिसणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. 'आम्ही जरांगे' सिनेमातील मनोज जरांगेचा चेहरा अखेर समोर आला आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवलेले मकरंद देशपांडे या सिनेमात मनोज जरांगेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझरमध्ये जरांगेंच्या भूमिकेत असलेले मकरंद देशपांडे ओळखूदेखील येत नाहीत. 

'आम्ही जरांगे' सिनेमाच्या टीझरमध्ये मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाची एक झलक पाहायला मिळत आहे. या टीझरमधील डायलॉग विशेष लक्षवेधी ठरत आहेत. "कर्म मराठा, धर्म मराठा", "तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल", "दहशतवादी आहोत का आम्ही" मनोज जरांगेंच्या तोंडी असलेल्या या डायलॉगमुळे सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर असणारा हा सिनेमा येत्या १४ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन योगेश भोसले यांनी केलं आहे. या सिनेमाबाबात चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.  

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठी अभिनेतासेलिब्रिटी