वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या टीझरपासून चित्रपटामधील संवाद, गाणी यांची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली होती ... नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे... आणि अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या शो पासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा एकदम कडक रिस्पोन्स मिळतो आहे ... चित्रपटामध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या उदय – अस्ताचा प्रवास दाखविण्यात आला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली असून तो ही व्यक्तिरेखा जगला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही... डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा लुक, संवाद फेक, अस्वस्थता, बिनधास्तपणा, बेफिकीरीपणा, त्यांचे अभिनयाबद्दलचे वेड हे अतिशय उत्तमप्रकारे सुबोध भावेने त्याच्या अभिनयाद्वारे पडद्यावर साकारले आहे आणि हेच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडत आहे ... चित्रपटामधील सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, वैदेही परशुरामी, नंदिता धुरी यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे... या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.
‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाची कथा, अभिनय याच्यासोबतच चित्रपटातील संवाद, तुम्हावर केली मी मर्जी बहाल आणि गोमू संगतीने ही गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर कसे होते? डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यातील रंगभूमीचे, नाटकाचे महत्त्व ... उतरती कळा लागल्यानंतर त्यांनी कसा स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला... डॉ. काशिनाथ घाणेकर आणि इरावती घाणेकर तसेच डॉ. काशिनाथ घाणेकर आणि कांचन घाणेकर यांचा प्रवास ... अशा विविध छटा उत्तम प्रकारे सुबोध भावेने या चित्रपटामध्ये साकारल्या आहेत.
‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ एकच दिवस झाला असून प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे. या चित्रपटाला समीक्षकांची देखील पसंती मिळाली आहे. सुबोधचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवेल यात काहीच शंका नाही.