Join us  

"...म्हणून मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जात नाही", संदीप पाठक असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:04 AM

पंढरपुरात गेल्यावरही मंदिरात जात नाही मराठी अभिनेता, म्हणाला, "मी फक्त कळसाचं दर्शन घेतो, कारण..."

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीचा राज्यभरात उत्साह पाहायला मिळत आहे. पायीवारी करत विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन पंढरपूरात दाखल झालेल्या वारकऱ्यांना अखेर आज विठुरायाचे दर्शन मिळणार आहे. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी वारीत सहभागी होत वारकऱ्यांबरोबर आनंद घेतात. अनेक जण विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठतात. पण, अभिनेता संदीप पाठक मात्र पंढरपुरात जाऊनदेखील विठुरायाच्या मंदिरात मात्र जात नाही. याचं नेमकं कारण त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने संदीप पाठकचं "जगात भारी पंढरीची वारी" हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत संदीप पाठकने पंढरपुरात गेल्यानंतर मंदिरात जात नसून फक्त कळसाचं दर्शन घेत असल्याचं म्हटलं आहे. "पंढरपुरात गेल्यानंतर मी मंदिरात जात नाही, मी फक्त कळसाचं दर्शन घेतो. आळंदीहून वारकरी ग्यानबा तुकाराम म्हणत २२ दिवस पायी वारी करत पंढरपूरला जातात. विठुरायाच्या दर्शनासाठी ते ३८ तास उभे राहतात. ३८ तास रांगेत उभा असलेल्या वारकऱ्याला सोडून मला डायरेक्ट दर्शन दिलं तर विठ्ठल माझ्याकडे बघणारही नाही", असं संदीप पाठकने सांगितलं.

"तो कमरेवर हात ठेवून विठेवर उभा आहे. त्याचं लक्ष डायरेक्ट दर्शन घेणाऱ्यांकडे नाहीच आहे. तो त्याच्या नजरेच्या समोर बघतो. त्याला तो शंभर मार्क तो देतो आणि माझ्यासारख्या डायरेक्ट दर्शन घेणाऱ्यांना तो ६५ मार्क देतो. म्हणून मी जातच नाही. कारण, माझी ती पात्रताच नाही. मी नामदेव पायरीचं दर्शन घेतो. बाहेरून मंदिराचं दर्शन घेतो", असंही तो म्हणाला.

संदीप पाठक हा मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. सध्या तो 'इंद्रायणी' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.  अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'अल्याड पल्याड' या सिनेमात तो दिसला होता. 

टॅग्स :आषाढी एकादशीमराठी अभिनेताटिव्ही कलाकारपंढरपूर