Join us

या दिवशी प्रदर्शित होणार अभिनय बेर्डेचा अशी ही आशिकी चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 3:21 PM

अभिनयने ती सध्या काय करते या त्याच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे चांगलेच फॅन फॉलॉविंग मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या अशी ही आशिकी या चित्रपटाची त्याच्या फॅन्सना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

ती सध्या काय करते या चित्रपटाद्वारे अभिनय बेर्डेने मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री केली. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो मुलगा असल्याने त्याच्या पदार्पणापूर्वीच त्याच्या नावाची चर्चा झाली होती. त्याच्याकडून प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा होत्या. ती सध्या काय करते या चित्रपटाद्वारे त्याने तो एक चांगला अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे तो पुढच्या कोणत्या चित्रपटात झळकणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. त्याच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा काहीच महिन्यांपूर्वी करण्यात आली. आता तो अशी ही आशिकी या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती सचिन पिळगांवकर करणार आहेत. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टी सिरीज या चित्रपटाची निर्मिती करत असून येत्या व्हेलेंटाईन डे साठी हे अभिनयच्या फॅन्ससाठी गिफ्ट असणार आहे. सचिन पिळगांवकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे. 

सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध जोडी होती.आता सचिन लक्ष्मीकांत यांच्या मुलासोबत काम करणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. सचिन पिळगावकर यांनी गेल्या वर्षी म्हणजेच १५ ऑगस्ट 2017 रोजी त्यांच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात हेमल इंगळे अभिनयच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी एखाद्या नव्या चेहऱ्याच्या शोधात चित्रपटाची टीम असल्यानेच हेमल इंगळेची निवड करण्यात आली. अशी ही आशिकी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असली तरी या चित्रपटात अभिनयचा लूक कसा असणार हे पाहण्यासाठी त्याच्या फॅन्सना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. 

अभिनयने ती सध्या काय करते या त्याच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे चांगलेच फॅन फॉलॉविंग मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या अशी ही आशिकी या चित्रपटाची त्याच्या फॅन्सना चांगलीच उत्सुकता लागली असणार यात काही शंकाच नाही. 

टॅग्स :अभिनय बेर्डेसचिन पिळगांवकर