सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा म्युझिकल रोमँटिक सिनेमा १ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमातील कलाकार अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे यांच्यातील ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील.
या सिनेमाच्या निमित्ताने अभिनय बेर्डे दुस-यांदा प्रेक्षकांसमोर येतोय आणि ‘स्वयम’ या त्याच्या पात्राविषयी सर्वांना कल्पना आहे. पण यावेळी अभिनयकडून जाणून घेतल्या आहेत ‘अभिनय बेर्डे’विषयी बरंच काही-
जर एखाद्या मुलीला अभिनयला इम्प्रेस करायचं असेल तर काय जुळून आलं पाहिजे हे अभिनयने स्पष्ट सांगितलंय की, “एखाद्या मुलीला मला इम्प्रेस करायचं असेल तर आमच्या दोघांचे इंटरेस्ट सेम असायला हवेत. सिनेमाच्या बाबतीत, खाण्या बाबतीत आमची आवड सेम असली पाहिजे. ती किती रियल आहे, तिचा स्वभाव किती खरा आहे, खरेपण मला खूप आकर्षक वाटतं, व्यक्तीमध्ये खरे पण मी खूप बघतो. अशी व्यक्ती असेल तर मी लगेच इम्प्रेस होऊन जाईल.”
या सिनेमात अभिनयने सचिनजी, सुनिल बर्वे या दोन उत्तम कलाकारांसोबत काम केलं आहे. तर त्यांच्याविषयी दोन शब्दांत व्यक्त होताना त्याने म्हटले की, “माझ्या जन्मापासून सचिन सर आणि माझी ओळख आहे. काका आणि पुतण्याचं आमचं नातं आहे आणि आता गुरु-शिष्याचं, मित्राचं नातं देखील तयार झालं आहे. त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकलो. पुढे भविष्यातही त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी असं खरंच वाटतं. तर, माझ्या वडीलांचे लाडक होते सुनिल काका. दोघेही खूप छान मित्र होते. मी करत असलेली भूमिका साकारताना त्यांची खूप मदत झाली. आम्हां दोघांचे जे सीन्स आहेत ते करताना मजा आली. ते उत्तम दर्जाचे नट आहेत. माझी इच्छा आहे की मला त्यांच्यासोबत नाटकात काम करायचंय आणि आशा आहे की ते मला नक्की चान्स देतील.”
सह-कलाकार हेमलविषयी बोलताना त्याने म्हटले की, “वर्कशॉप चालू झालं तेव्हा आम्ही को-ऍक्टर होतो. हळू-हळू आमची मैत्री चांगली होत गेली. हेमल अत्यंत कॉन्फिडंट, स्वत:ला व्यवस्थित कॅरी करणारी,हुशार, अभ्यासू आहे. तिची अभ्यासू वृत्ती, नवनवीन काही शिकण्याची आवड, तसेच घेतलेली मेहनत यामुळे ती नक्की पुढे जाईल अशी मला खात्री आहे. या सिनेमाच्या दरम्यान मला चांगली मैत्रिण मिळाली हे मी आवर्जुन सांगेन.”
फिल्मी अभिनयची फिल्मी फिलॉसॉफी जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल ना... तर त्याने शेअर केली आहे त्याची फिल्मी फिलॉसॉफी, “माझी एकच फिल्मी फिलॉसॉफी आहे आणि ती म्हणजे ‘इश्क-ए-फिल्लम जुनून-ए-फिल्लम’. माझं इश्क पण फिल्मच आहे आणि माझ्यामधला जो जुनून आहे तो देखील फिल्म आहे. माझा जन्म सिनेमे करण्यासाठी झाला आहे आणि मी आयुष्यात तेच करणार आणि नक्की यश मिळवून दाखवणार.”
स्वयम आणि अभिनय यांच्यामध्ये काय साम्य आहे हे सांगताना त्याने म्हटले की, “खरं तर स्वयम हा माझ्यासारखा आहे पण नाही पण. तो माझ्यासारखा इनोसंट, भोळा आहे. मला स्वयमचं पात्रं साकारताना खूप धमाल आली. स्वयम सिंगल चाईल्ड आहे, त्याच्या वडीलांनी त्याची देखभाल केली आहे. त्याचे त्याच्या आईवरही तितकेच प्रेम आहे. तो प्रेमळ आहे, छान गातो आणि गिटारही उत्तम वाजवतो... या दोन क्वालिटीस् माझ्यामध्ये पण आहेत असं मला वाटतं.”
या सिनेमात सोनू निगम यांनी सर्वच काही अभिनयसाठी गायली आहेत. याविषयी स्पेशल भावना व्यक्त करत त्याने म्हटले की, “माझी प्लेलिस्ट पाहिली तर सोनू निगम यांची १०० गाणी नक्कीच दिसतील. मी त्यांचा खूप खूप मोठा फॅन आहे. माझ्यासाठी हे ड्रिम कम ट्रू आहे. बॉलिवूडमधल्या सर्व सुपरस्टारसाठी सोनू निगमजी यांनी गाणी गायली आहेत आणि या सिनेमात ते माझ्यासाठी आवाज देत आहेत ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”
“सिनेमा साईन करताना मी माझं पात्रं शोधतो. मला सर्वांसोबत काम करायचंय. पण मी स्क्रिप्ट बघतो कारण कंटेट हा मराठीतला सुपरस्टार आहे. माझा चेहरा बघण्यापेक्षा सिनेमाचा टिझर कसा झाला आहे, मार्केटिंग कसं झालं आहे, सिनेमाची कथा प्रेक्षकांना कशी वाटते इ. गोष्टी बघून लोकं थिएटरमध्ये जातात. त्यामुळे माझा प्रयत्न हा असतो की फक्त पैशांसाठी काम न करता आपण चांगल्या स्क्रिप्टसाठी काम करावं, एका चांगल्या पात्राला शोधावं.” असे अभिनयने सांगितले.