त्सुनामी बनून आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेने सगळ्यांच्याच चिंता वाढवल्या आहेत. परिस्थिती भीषण आहे. रोज देशात हजारो लोक कोरोनाचे बळी ठरत आहेत. गेल्या 24 तासांत साडेतीन हजार लोकांनी प्राण गमावले आहेत. रूग्णालयात बेड नाहीत, ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा आहे. अशात सरकार व सरकारी यंत्रणांबद्दल लोकांचा संताप वाढत चालला आहे. देशभरातून राजकारणी आणि सरकारवर टीका होतेय. या पार्श्वभूमीवर अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) यानेही सरकारवर ताशेरे ओढले आहेत. अरे हाड.....आम्ही प्रश्न विचारणार....सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला....उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार....., असे काही दिवसांपूर्वीच आस्तादने ठणकावले होते. आता त्याची अशीच अप्रत्यक्षपणे व उपरोधिकपणे सरकारला लक्ष्य करणारी एक पोस्ट सध्या जाम चर्चेत आहेत.
आस्तादची पोस्ट
आपण कर का भरतो?१) नागरिकत्व टिकवण्यासाठी भाडं म्हणून? २) सरकारला योग्य, चांगल्या मूलभूत सुविधा आपल्याला उपलब्ध करून देता याव्यात, त्याला हातभार म्हणून?३) "आपल्याकडे मुबलक धनसंपत्ती आहे, वाटूया इतरांमधे बरीच" असं स्वत:ला पटावं म्हणून?४) वरीलपैकी काही नाही?*४था पर्याय निवडल्यास अतिरिक्त कारण सुचवावं ही विनंती.अशी पोस्ट आस्तादने शेअर केली. त्याच्या या पोस्टवर नेटकरी भरभरून कमेंट्स देत आहेत. यापैकी अनेक कमेंट्सला आस्तादने उत्तरही दिले आहे.इतकी नकारात्मकता का? खरंच, काहीच मिळत नाही आपल्याला? अपेक्षेइतकं नसेल, पण काहीच नाही? अशी कमेंट करणा-या एका युजरला आस्तादने उत्तर दिले.ही नकारात्मकता नाही. आज 2021 साली आपण अखंड वीज पुरवठा देऊ शकत नाही आहोत. 90 टक्के रस्ते आहेत जे एक वर्षसुद्धा शाबूत राहत नाहीत. शेतीप्रधान अर्थकारण असलेल्या देशात अजून पाण्याच्या नियोजनाची बोंब, पावसावर जवळजवळ सर्वस्वी अवलंबून. या मूलभूत गोष्टी नाहीत का? अपवाद आहेतच, निश्चित आहेत, पण किती?? असे आस्तादने लिहिले आहे.
भन्नाट जवाब
आपण कर का भरतो? हा आस्तादचा सवाल सरकारवर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढणारा आहे. पण काही चाहत्यांनी त्याच्या या प्रश्नावर भन्नाट उत्तरे दिली आहेत. यात अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ हिचाही समावेश आहे. माझ्यावर इन्कम टॅक्सवाल्यांची धाड पडू नये म्हणून, अशी कमेंट तिने केली आहे.
आपण मूर्ख आहोत म्हणून, अशी कमेंट एका चाहतीने केली आहे. इतक्या सगळ्या गैरसोयी आणि भीषण परिस्थितीतही आपण आनंदी राहू शकतो याची खंडणी म्हणून असे एका युजरने लिहिले आहे.