Join us

अभिनेता अमित्रियान पाटीलच्या भूमिकेला रसिकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 09:39 IST

अभिनेता अमित्रियान पाटीलने साकारलेला 'शिवाजी पाटील' प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. शिवाय, राजकारणी डावपेच आणि हेवेदाव्यांचे चोख विश्लेषण या सिनेमात मांडले असल्याकारणामुळे हा सिनेमा सामान्यांच्या मनात थेट घर करण्यास यशस्वी होत आहे.

शेतकऱ्यांचा आक्रोश मांडणारा, आणि आजच्या तरुण शेतकरीवर्गाला प्रेरणा देणाऱ्या 'आसूड' सिनेमाला ग्रामीण महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. एग्रीकल्चर शाखेत पदवी मिळवलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाला नागपूर, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या भागातील प्रेक्षकांनी चांगली साथ दिली आहे. खास करून, अभिनेता अमित्रियान पाटीलने साकारलेला 'शिवाजी पाटील' प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. शिवाय, राजकारणी डावपेच आणि हेवेदाव्यांचे चोख विश्लेषण या सिनेमात मांडले असल्याकारणामुळे हा सिनेमा सामान्यांच्या मनात थेट घर करण्यास यशस्वी होत आहे.

गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत आणि डॉ. दीपक मोरे निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे. जनतेच्या मनात दडलेल्या असंतोषाचे आणि जनतेच्या एकीचे दर्शन घडवणाऱ्या ‘आसूड’ चित्रपटाला पश्चिम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. संघर्षकथेतून सकारात्मकता देणाऱ्या या चित्रपटाचे सिने- समीक्षकांनीदेखील विशेष कौतुक केले आहे. एका वेगळ्या धाटणीची कथा, उत्तम अभिनयाच्या माध्यमातून खुलवण्याचा यशस्वी प्रयत्न अमित्रियानने केला असून, अनेक वर्षांनी मराठीत आलेला हा थरारक राजकीय पट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला आहे. 

शिवाय मराठीत ज्येष्ठ व प्रतिष्टीत कलाकारांचा ताफा या सिनेमाच्या साथीला आहे. विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसून येतात. विशेष म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांचे संगीत या सिनेमाला लाभले असल्याकारणामुळे, हा सिनेमा कथा, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय आणि संगीत अश्या सर्व बाजूने दर्जेदार बनला आहे.