खलनायकाच्या भूमिका म्हटल्या तर डोळ्यासमोर येतात ते सदाशिव अमरापूरकर, सयाजी शिंदे, दीपक शिर्के, महेश मांजरेकर, विजू खोटे, मोहन जोशी असे अनेक कलाकारांच्या भूमिका डोळ्यासमोर उभ्या राहतात. याच यादीत अभिनेते अनंत जोग यांचाही समावेश होतो. अनंत जोग यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही आपल्या भूमिकांनी छाप पाडली आहे.
'रावडी राठोड','नो एन्ट्री', 'शांघाय', 'दहेक', 'कच्ची सडक','सरकार', 'लाल सलाम', 'रिस्क', 'सिंघम' यांसारख्या सुपहिट सिनेमातल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या आहेत. त्यांनी अनेक हिंदी सिनेमात खलनायकाच्या भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन केले आहे. सिनेमाच नाही तर मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. रुपेरी पडद्यावर खलनायकी भूमिकेने आपले अस्तित्व निर्माण करणारे अनंत जोग यांनी मराठी मालिकेत मात्र हळव्या भूमिका साकारल्या आहेत.
अनंत जोग यांच्या प्रमाणे त्यांची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. उज्वला जोग असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. उज्जवला जोग टीव्ही मालिका तसेच नाटकातूनही रसिकांच्या भेटीला आल्या आहेत. 'कुंकू लावते माहेरचं', 'नवरा बायको', 'सौभाग्य कांकन' या मालिकेतल्या त्यांच्या भूमिका पसंतीस पात्र ठरल्या तर 'सूर्याची पिल्ले','ढोल ताशे','लुका छुपी' ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. आजही त्यांच्या भूमिका त्यांच्या चाहत्यांच्या लक्षात आहेत.
अनंत जोग आणि उज्वला जोग यांच्या प्रमाणे त्यांच्या मुलीनेही इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. क्षिती जोग असे तिचे नाव. आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्षितीनेही अभिनय क्षेत्रात एंट्री करत स्वतःला सिद्ध केले.
क्षिती जोग 'दामिनी' या गाजलेल्या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. 'तू तिथे मी','गंध फुलांचा गेला सांगून' मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेतही तिच्या भूमिकांनी तिने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. 'घर की लक्ष्मी बेटिया','साराभाई vs साराभाई', 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतही क्षिती झळकली होती.
क्षितीने अभिनेता हेमंत ढोमेसह लग्न करत संसार थाटला आहे. दोघेही सोशल मीडियावर त्यांचे खास फोटो शेअर करत त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात.