राज्यसभा निवडणुकीनंतर नुकतीच विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे या निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला जबर धक्का दिला. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केला. शिंदे अचानकपणे नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. परंतु, या प्रकरणी त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत त्यांच मत मांडलं. विशेष म्हणजे त्यांच्या प्रतिक्रियेवर एका मराठमोळ्या अभिनेत्याने ट्विट करत जनतेचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं. त्यांच्या या ट्विटनंतर राज्यात राजकीय घटनांना उधाण आलं. यामध्येच मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर याने एकनाथ शिंदे यांचं ट्विट रिट्विट करत त्याच मत मांडलं आहे.
आरोह वेलणकर कायम राजकीय घडामोडींवर त्याचं मत मांडत असतो. यावेळी त्याने एकनाथ शिंदे यांच्याविषयी मत मांडलं आहे. “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे. त्यावर आरोह वेलणकरने रिट्विट करत ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’, असे ट्विट केले आहे.
दरम्यान, आरोहचं हे ट्विट पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. तर, काहींनी त्याला ट्रोल केलं आहे. प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘घंटा’ या चित्रपटात झळकला. आरोहने चित्रपटांसह काही मालिका व रिअॅलिटी शोमध्येही काम केलं आहे.