इंडस्ट्रीत अनेक कलाकार जोडपी सक्रिय आहेत. असेच एक जोडपे म्हणजे क्षिती जोग आणि हेमंत ढोमे. दोघेही उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते असण्यासोबतच एकमेकांचे चांगले साथीदारही आहेत. आज क्षितीचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त हेमंतने आपल्या लाडक्या पाटलीणबाईसाठी अर्थात क्षितीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
हेमंत ढोमेने सोशल मीडियावर क्षिती जोगचा एक फोटो शेअर केला. त्यात त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या फोटोतलं हसू कायम असंच राहूदे! आपल्या लाईफची एनर्जी! जशी आहेस तशीच रहा, मालकीणबाई…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! गेलं वर्ष तर तू गाजवलंस, असंच कमाल काम करत रहा…येणारं वर्ष सुद्धा तुला जे हवं ते देईल! Love you…'. . हेमंतच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसोबत चाहते देखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
वर्ष २०२३ हे क्षिती आणि हेमंत दोघांसाठी दमदार राहिलं. त्यांच्या झिम्मा २ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळला. झिम्मा २ हा सिनेमा हेमंतनेच दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर खूप यश मिळत आहे. विशेष म्हणजे समोर तगडे बॉलिवूड सिनेमे असूनही या सिनेमाने तग धरुन ठेवली आहे. तर या सिनेमात क्षितीने साकारलेल्या भूमिकेनेही सर्वांची मनं जिंकली. शिवायं क्षितीनं करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली. या सिनेमात क्षितीने रणवीरच्या आईची भूमिका साकारली. क्षितीच्या भूमिकेचे खूप कौतुक झालं. अशाप्रकारे क्षितीने २०२३ वर्ष गाजवलंय.
क्षिती आणि हेमंत यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाल्यास, 'सावधान शुभमंगल' या नाटाकाच्या रिहर्सलवेळी त्या दोघांची भेट झाली होती. त्याआधी हेमंत क्षितीला ओळखत होता. ती त्याच्या एका नाटकाला देखील गेली होते. पण 'सावधान शुभमंगल' या नाटाकाच्या रिहर्सलच्या वेळी त्यांची ओळख झाली. पुढे एकमेकांच्या सहवासात राहून त्यांच प्रेम बहरत गेलं. एकमेकांना प्रपोज न करताही आपण प्रेमात पडल्याची जाणीव त्यांना झालेली. आणि अखेर हेमंत आणि क्षिती यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. पुढे त्यांचा संसाराचा गाडा सुरु झाला.