मराठी सिनेमांना प्राईम टाइम न मिळणं, प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवणं वा प्रदर्शनाच्या तारखांमध्ये ऐनवेळी बदल करणं अशा कितीतरी अडचणी कायम मराठी सिनेमांसमोर येत असतात. याचा फटका निर्माते, दिग्दर्शक यांनाही बसतो. असाच एक फटका 'गेट टुगेदर' या सिनेमाला बसला आहे. अभिनेता एकनाथ गिते (eknath gite) याने अलिकडेच 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ऐनवेळी कशी बदलली हे सांगत मराठी कलाविश्वाच्या दुसऱ्या बाजूवरही प्रकाश टाकला.
'गेट-टुगेदर' हा मराठी सिनेमा अलिकडेच २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यापूर्वी या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख १२ मे रोजी निश्चित करण्यात आली होती. परंतु, अचानक रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला. याविषयी एकनाथ गिते याने नेमका काय प्रकार घडला हे सांगितलं.
"आधी आम्ही हा सिनेमा १२ मे रोजी रिलीज करणार होतो. पण, आम्हाला एका ठिकाणाहून फोन आला आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करा, असं सांगितलं. आपल्या सिनेमाच्या तारखा एकच आहेत. त्यामुळे स्पर्धा नको म्हणून तुम्हाला तुमच्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलता आली तर बघा, असं सांगितलं. त्यानंतर आम्ही १९ मे रोजी हा सिनेमा रिलीज करायचं ठरवंल. त्यानुसार, प्रमोशनही सुरु केलं. पण, त्यावेळीही सेम झालं. अजून एका ठिकाणाहून फोन आला.त्यामुळे आपल्याला स्पर्धा नको आणि मराठी प्रेक्षक विभागले जाऊ नयेत म्हणून तुम्ही तुमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख थोडी पुढे ढकला, असं सांगितलं,” असं एकनाथ म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "त्यांचा फोन आल्यानंतर आम्हीही मनाचा मोठेपणा दाखवला आणि पुन्हा तारीख पुढे ढकलतं ती २६ मे केली. पण, नंतर आम्हाला कळलं की ज्यांनी सुरुवातीला आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्यांनीच १२ मे ऐवजी २६ मे ला सिनेमा रिलीज केला. या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलं. प्रेक्षक विभागले जाऊ नयेत यासाठी आम्हाला तारीख पुढे ढकलायला सांगितली. परंतु, सिनेमा रिलीज करताना आम्हाला काहीही न सांगता थेट रिलीज केला."
दरम्यान, आमच्या चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ सगळे नवीन होते. आमच्या दिग्दर्शकांचा हा दुसरा सिनेमाही होता त्यामुळे आम्ही कोणीच काही बोलू शकलो नाही. पण, आमचं प्रमोशन, वेळ सगळं वाया गेला. इतकंच नाही तर आर्थिक नुकसानही झालं. एकनाथ गिते याने छोट्या पडद्यापासून त्याच्या करिअरची सुरुवात केली आहे. अलिकडेच तो हृदयी प्रीत जागते या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने किश्या रांगडे-पाटील ही भूमिका साकारली होती. तसंच तो गाथा एकनाथांची या पौराणिक मालिकेतही झळकला होता.