सिनेमातील कलाकारही ‘फर्जंद’च्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 11:21 AM
शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘फर्जंद’ची सगळीकडे चर्चा सुरू आहे. सिनेमाचे प्रोमोज प्रेक्षकांसोबतच सिनेसृष्टीतील मान्यवरांचेही लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. एकूणच ...
शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘फर्जंद’ची सगळीकडे चर्चा सुरू आहे. सिनेमाचे प्रोमोज प्रेक्षकांसोबतच सिनेसृष्टीतील मान्यवरांचेही लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. एकूणच संपूर्ण वातावरण ‘फर्जंद’मय झालं आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात प्रेक्षकही सिनेमागृहात गर्दी करणार यात शंका नाही. या सिनेमात मराठीतील आघाडीच्या कलावंतांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या नजरेतून ‘फर्जंद’वर टाकलेला एक दृष्टिक्षेप...आजवर विविध मालिकांचं लेखन केलेल्या दिग्पाल लांजेकरने ‘फर्जंद’च्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या ‘फर्जंद’ची सहनिर्मिती संदीप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार यांनी केली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील वीरमावळा कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा पाहायला मिळेल. या सिनेमात अंकित मोहनने शीर्षक भूमिका साकारली असून मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. याखेरीज चिन्मय मांडलेकरने शिवराय, प्रसाद ओकने बहिर्जी नाईक, तर मृण्मयी देशपांडेने केसर या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने कलाकारांना आलेले अनुभव रोमांचक आहेत. ‘फर्जंद’मध्ये काम केलेल्या प्रत्येक कलाकाराला या सिनेमाने काही ना काही दिलं आहे. मृणाल कुलकर्णी ‘फर्जंद’मध्ये पुन्हा एकदा जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार असल्या तरी या सिनेमात जिजाऊंचे वेगळे पैलू पहायला मिळतील असं त्या मानतात. ‘फर्जंद’बाबत मृणाल म्हणाल्या की, राजमाता जिजाऊंची व्यक्तिरेखा साकारणं हे माझ्यासाठी नवीन नसलं तरी ‘फर्जंद’मध्ये साकारलेल्या जिजाऊ वेगळ्या आहेत. कारण यापूर्वी तारुण्यापासून वयोवृद्ध या कालावधीतील जिजाऊंच्या विविध छटा रेखाटल्या आहेत. पण ‘फर्जंद’मध्ये एकाच वयोगटातील जिजाऊ पाहायला मिळतील. हा सिनेमा खऱ्या अर्थाने शिवरायांच्या मावळ्यांचा गौरव करणारा आहे. नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा चिन्मय मांडलेकर ‘फर्जंद’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाबाबत तो म्हणाला की, ‘तू माझा सांगाती’ या मालिकेदरम्यान दिग्पालने लिहिलेली ‘फर्जंद’ची पटकथा जेव्हा वाचली तेव्हाच मी या सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक झालो होतो. त्यावेळी मी ‘फर्जंद’मध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार हे मलाही ठाऊक नव्हतं, पण दिग्पालने जेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबाबतसांगितलं तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. शिवरायांचा गेटअप केल्यावर एक वेगळंच स्फुरण चढलं आणि त्यांच्या आशिर्वादानेच कॅमेऱ्यासमोर शिवराय साकारणं सोपं गेलं. अभिनयासोबतच दिग्दर्शक म्हणूनही लोकप्रिय झालेल्या अभिनेता प्रसाद ओकने ‘फर्जंद’मध्ये शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्याचा गुप्तहेर अशी ख्याती असलेल्या बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारली आहे. ‘फर्जंद’च्या निमित्ताने शिवरायांच्या स्वराज्याच्या कारभाराचे विविध पैलू समजल्याचं सांगत प्रसाद म्हणाला की, ‘फर्जंद’मध्ये मी साकारलेली व्यक्तिरेखा माझ्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक आहे. खरं तर या सिनेमाच्या निमित्ताने बहिर्जी नाईकांबाबतची माहिती मिळाली. शिवरायांचं गुप्तहेर खातं कशा पद्धतीने काम करायचं ते समजलं आणि बहिर्जी नाईकांप्रमाणे शिवरायांना स्वराज्याच्या कामात मदत करणाऱ्या तमाम मावळ्यांबद्दलचा आदर आणखी वाढला. कोणतीही भूमिका सहजपणे साकारण्याचं कसब अंगी असलेल्या मृण्मयी देशपांडेने ‘फर्जंद’मध्ये साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे. याबाबत मृण्मयी म्हणाली की, ‘फर्जंद’मधील केसरच्या रूपात माझी निवड केली जाणं हे दिग्पालचं व्हिजन आहे. शिवकालीन सिनेमे पाहताना आपल्यालाही अशीच एखादी हाती तलवार घेत लढणारी व्यक्तिरेखा साकारता यावी असं बऱ्याच कलाकारांना वाटत असतं. ‘फर्जंद’च्या निमित्ताने माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. या सिनेमात मी साकारलेली केसर जरी कलावंतीण असली तरी स्वराज्याच्या रक्षणाकरीता हाती तलवार घ्यायलाही ती मागेपुढे पाहात नाही.