मुंबई : अलीकडेच राज्य सरकारनं एक मोठी घोषणा करत छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखं भारतात आणणार असल्याचं जाहीर केलं. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली असून शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सरकारच्या या पावलाचं सर्व स्तरातून कौतुक होत असतानाच सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं. "जमलं तर त्या वाघनखांनी भष्ट्राचाराचा कोथळा काढता आला तर पाहा", अशा आशयाची पोस्ट नानांनी केली होती. यावर आता नानांनी स्पष्टीकरण दिलं असून राजकीय मंडळींना चिमटे काढले आहेत.
नानांचा मिश्किल टोला
भ्रष्टाचार सगळीकडं असून तो राजकीय मंडळी कमी करू शकतात. त्यामुळे मी गंमत म्हणून ट्विट केलं होतं, हे चिमटे काढत राहायला हवं. कारण फक्त नखं वाढवून चालणार नाही, असं नानांनी सांगितलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. "भ्रष्टाचारात आपलं नाव येत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. सगळेच वाईट आहेत अशातलाही भाग नाही. पण, काहींमुळे ओलं देखील जळत राहतं. त्यामुळे सरसकट राजकारणी भ्रष्टाचारी आहेत असं म्हणता येणार नाही. खरं तर नाव घेऊन बोलता यायला पाहिजे. पण पुन्हा कोण कोर्ट कचेरी करत बसणार... नाहीतर मी नावं देखील सांगितली असती. तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यात एक यादी आहे, या लोकांना तुडवलं पाहिजे. कोणाच्या यादीत मी देखील असेन", असंही त्यांनी सांगितलं.
नुसतं गप्प राहिल्यानं गृहीत धरलं जातं - नाना नाना पाटेकरांनी आणखी सांगितले की, दुर्दैव असं आहे की, आम्ही व्यक्त होत नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांना गोळ्या घाला असं मी म्हणत नाही. पण निदान आपण बोलायला हवं. नुसतं गप्प राहिल्यानं गृहीत धरलं जातं. त्यामुळे बोलायला शिका, मला कोणी गोळ्या मारल्या तरी काय वाटणार नाही इतकी वर्ष चित्रपटात काम करता आलं हे खूप आहे माझ्यासाठी. पण, बोलायला शिकलं पाहिजे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा वध केला ती वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अलर्ब्ट वस्तूसंग्रालयात ठेवण्यात आली आहेत. इंग्रजांच्या राजवटीत ही वाघनखं इंग्लंडला नेण्यात आली होती. ब्रिटनच्या ताब्यात असलेली ही वाघनखं पुन्हा भारतात आणण्यात येणार आहेत. याबाबत एक करार केला जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात शिवप्रताप दिनी ही वाघनखं भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.