Join us

Surya : ‘सूर्या’  चित्रपटातून मराठीला मिळणार नवा अ‍ॅक्शन हिरो, ‘तो’ आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 4:15 PM

Surya Marathi Movie : मराठमोळा ‘सूर्या’ अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे...

आज एकीकडे बॉक्स ऑफिसवर दक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला आहे, तर दुसरीकडे देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठीचा डंका वाजतोय. प्रेक्षकांनी हिंदी सिनेमांकडे पाठ फिरवली असली तरी दक्षिणात्य सिनेमांप्रमाणेच काही मराठी चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारे अ‍ॅक्शनपटही बनू लागले आहेत. अंगावर रोमांच आणणारे स्टंटस आता मराठी चित्रपटातही पहायला मिळणार आहेत. नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीतही धडाकेबाज अ‍ॅक्शनपट येणार आहे. मराठमोळा ‘सूर्या’ (Surya)अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘सूर्या’  या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक अलीकडे रिव्हील करण्यात आला आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सचा ‘सूर्या’  हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट २०२३ या नव्या वषार्तील पहिल्या आठवड्यात ६ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

हसनैन हैद्राबादवाला यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सूर्या’  चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीच्या पटलावर एका नव्या अ‍ॅक्शन हिरोचा उदय होणार आहे. पिळदार शरीरयष्टी, डौलदार चाल, वाघासारखी नजर, चित्यासारखा वेग लाभलेलं भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेला प्रसाद मंगेश हा उदयोन्मुख स्टार ‘सूर्या’ मध्ये मुख्य भूमिकेत आहे. ‘सूर्या’ च्या फर्स्ट लुकद्वारे जणू प्रसाद मंगेशचं ‘अँग्री यंग मॅन’ रूपच समोर आलं आहे. स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना कुटुंब आणि प्रेमावर घाला घालणाºया खलनायकाला धोबीपछाड देणारा डॅशिंग ‘सूर्या’ ला रुपेरी पडद्यावर पहाणं ही प्रेक्षकांसाठी जणू एक मेजवानीच ठरणार आहे. याबाबत प्रसाद मंगेश म्हणाला की, ‘सूर्या’ च्या रूपात नायक बनून प्रेक्षकांसमोर येत असल्याचा आनंद आहे. पदार्पणातच अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यानं मराठी सिनेसृष्टीत दमदार एंट्री घेत आहे. हिच खऱ्या अर्थाने आनंद आणि समाधानाची गोष्ट आहे. लव्ह, अ‍ॅक्शन, इमोशन, ड्रामा, समधूर गीत-संगीत, स्मरणीय संवाद, उत्कंठावर्धक कथानक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे केलेलं सादरीकरण यामुळे ‘सूर्या’ च्या रूपात मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेजच पहायला मिळणार असल्यानं प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच आवडेल याची खात्री प्रसादला आहे.

लेखक मंगेश ठाणगे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या ‘सूर्या’ च्या कथेवर मंगेश ठाणगे यांनी विजय कदम यांच्या साथीनं पटकथा लिहिली आहे. विजय कदम, मंगेश केदार आणि हेमंत एदलाबादकर या त्रिकूटानं अतिशय मार्मिक संवादलेखन करत मोलाची कामगिरी बजावली आहे. या चित्रपटात प्रसाद मंगेश सोबत अखिलेंद्र मिश्रा, हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, पंकज विष्णू, अरुण नलावडे, गणेश यादव, संजीवनी जाधव, रुचिता जाधव, देवशी खांधुरी, हॅरी जोश, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बो-हाडे आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

डिओपी मधु एस. राव यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन राहुल भातणकर यांनी केलं आहे. या चित्रपटातील धडाकेबाज साहस दृश्ये आणि स्टंटस अ‍ॅक्शन दिग्दर्शक अब्बास अली मोगल आणि कौशल मोझेस यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रीत करण्यात आली आहेत. गीतकार बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संतोष मिश्रा, देव चौहान यांनी लिहिलेल्या गीतांना सुमधूर स्वरसाज चढवण्याचं काम संगीतकार देव चौहान यांनी केलं आहे. या गाण्यांवर गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांनी सुरेख कोरिओगाफी केली आहे. रेश्मा मंगेश ठाणगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, प्रसाद मंगेश, चेतन मंगेश हे या चित्रटाचे सहनिर्माते आहेत. संग्राम शिर्के या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

टॅग्स :मराठी चित्रपटमराठी अभिनेता