'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवे विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे (Anand Dighe) यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर-2 येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातच अभिनेता प्रसाद ओकने या सिनेमाचा तिसऱ्या भागाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
धर्मवीर-2 हा सिनेमा येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच हा सिनेमा हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतंच 'महाराष्ट्र टाइम्स आयोजित 'बायोपिक आणि मी कव्हरेज' या कार्यक्रमात प्रसाद ओकनं धर्मवीर सिनेमावर भाष्य केलं. तो म्हणाला, 'लवकरच धर्मवीर 2 सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं मला एकाच व्यक्तिरेखेवर आधारित दुसऱ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. कदाचित 'धर्मवीर 3' सुद्धा येईल'. प्रसादच्या या वक्तव्यावरुन आता धर्मवीर-3 देखील येणार अशी चर्चा रंगली आहे.
याआधीही 'धर्मवीर-2'च्या मुहुर्त सोहळ्यात बोलताना प्रसाद ओकनं सिनेमाच्या तिसऱ्या भागाबद्दल हिंट दिली होती. तो म्हणाला होता, 'आज आपण धर्मवीर-2 मुहुर्ताच्या निमित्ताने भेटलो आहोत. हा कार्यक्रम सुरू होतानाच साहेबांनी मला कानात विचारलं की आता तिसरा भाग पण येणार का? मला वाटतं ही दुसऱ्या भागाची सुरुवात म्हणजेच तिसऱ्या भागाची नांदी आहे'.
‘धर्मवीर 2’ या चित्रपटातही प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे. धर्मवीरच्या पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवलं होतं. आता दुसऱ्या भागात नक्की काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.