पुण्यात सोमवारी (17 मे 2020) प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या निधनानंतर दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. माझा प्रणित दादा गेला .. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला .. गीतकार ,लेखक ,दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही .. नंतर सविस्तर लिहिलच .. देवूळबंद ला माझ्या सोबत लेखन दिग्दर्शन आणि देऊळबंद , मुळशी पॅटर्न , सरसेनापती हंबीरराव चा गीतकार … अ रा रा खतरनाक , उन उन वठातून , आभाळा आभाळा , गुरूचरीत्राचे कर पारायण , हंबीर तु खंबीर तु अशी एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीतदादा गेला .. कायमचा .. अशा शब्दांत प्रविण तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रवीण तरडे व प्रणित कुलकर्णी हे दोघे खूप वर्षापासूनचे मित्र होते. मुळशी पॅटर्न चित्रपटातील 'आरारारा खतरनाक' या गाण्याने रसिकांना प्रचंड भुरळ घातली.
प्रणित आणि प्रवीण तरडे यांनी मिळून मुळशी पॅटर्न आणि देऊळबंद सिनेमाचे गीतलेखन आणि दिग्दर्शन केले होते. याशिवाय त्यांनी 'शिवबा ते शिवराय' दृकश्राव्य कार्यक्रम, 'जीवन यांना कळले हो' स्टेज रियालिटी शोचे त्यांंनी लेखन व दिग्दर्शन केले होते. "सुरक्षित अंतर ठेवा या नाटकाचे ते लेखक, दिग्दर्शक होते.
फिरोदिया करंडक स्पर्धा गाजवून प्रणित कुलकर्णी यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी गीतलेखन आणि ऑल द बेस्ट या टीव्ही के मालिकेचे लेखन दिग्दर्शन केले होते. तसेच लोकप्रिय झालेल्या 'लक्ष्य' या मालिकेचंही लेखक होतेे. गीतकार आणि म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून प्रणित यांनी बराच काळ काम केले आहे.