Pushkar Jog: पुष्कर जोग (Pushkar Jog) हा मराठी सिनेविश्वातील नावाजलेला अभिनेता आहे. लवकरत तो ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २१ मार्चला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता येणार आहे. पुष्कर जोग हा कायमच त्याच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने केलेल्या एका वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अलिकडेच ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पुष्कर जोगने नवशक्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, "प्रॉब्लेम असा आहे की, भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर बॉलीवूड हे मुंबईतच आहे. त्यात आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने आपलं वर्चस्व दाखवायला सुरु केलं आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीला महाराष्ट्रामध्ये काही किंमत उरली नाही, असा माझा समज आहे. म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीत आता काही मोठं झालं नाही, तर पुढचा काळ इंडस्ट्रीसाठी अवघड आहे."
पुढे अभिनेता म्हणाला, "आता मराठी चित्रपटांनी मोठी झेप घेतली पाहिजे. एक १०० कोटींची फिल्म आली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण पाहायला गेलं तर इतके सिनेमे येत आहेत आणि सिनेमे वाईट आहेत का? तर नाही. सगळे मराठी निर्माते, दिग्दर्शक उत्तम कलाकृती तयार (निर्माण) करत आहेत. सगळे सिनेमे उत्तमच आहेत. फक्त त्यांना थिएटर्स मिळत नाहीत, सध्या ही वस्तुस्थिती आहे. तुमचं मनोरंजन करण्यास आम्ही सज्ज आहोत. पण, आम्हाला ती संधी, तो प्लॅटफॉर्मच मिळत नाही."
अभिनेत्याने व्यक्त केली खंत
"आज ओटीटी माध्यमे मराठी फिल्म्स विकत घेत नाहीत, साऊथ इंडियन घेतात. मी त्यांचं नाव घेणार नाही. पण, मग तुम्ही म्हणता की, तुम्ही त्या दर्जाचे चित्रपट बनवा. मग आम्ही गुंतवलेले पैसे परत कसे मिळवायचे? तेवढे थिएटर्स, त्यासाठी लागणारा महसूल तसंच डिजिटल म्युझिक आहे का? तर अजिबातच नाही." अशी खंत अभिनेत्याने व्यक्त केली आहे.