Join us

चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत, पोस्ट करुन दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 12:03 IST

अभिनेता पुष्कर जोगला गंभीर दुखापत झाली असून त्याने पोस्ट शेअर करुन झालेल्या दुखापतीबद्दल सविस्तर माहिती त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. (pushkar jog)

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. पुष्करला आपण विविध  सिनेमांंमध्ये अभिनय करताना पाहिलंय. पुष्कर जोग सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय असतो. पुष्कर सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. पण पुष्करच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येतेय. आगामी सिनेमाच्या शुटींगदरम्यान पुष्करला गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे.

पुष्करने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय, "काल एका अॅक्शन सीक्वेन्सचं शुटींग करताना माझ्या हाताला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. खुप दुखतंय. खुप कठीण दिवस" पुष्करने ही पोस्ट लिहून सर्वांना त्याला झालेल्या दुखापतीची माहिती दिली. ही पोस्ट शेअर पुष्करच्या अनेक चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. पुष्कर सुद्धा दुखापतीवर उपचार घेताना दिसत आहे.

पुष्कर जोगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो सध्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' या सिनेमाचं शुटींग करत आहे. याच सिनेमाच्या शुटींगदरम्यान पुष्करला दुखापत झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून  काहीच दिवसांपुर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय पुष्करचा 'बापलेक' हा सिनेमाही या वर्षी रिलीज झाला होता.

टॅग्स :पुष्कर जोगआर्टिफिशिअल इंटेलिजन्समराठी