मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) महाराष्ट्राचा लाडका कलाकार आहे. हिंदीतही अभिनेत्याने डंका गाजवला आहे. तरी तो मूळ मातीशी जोडलेला आहे. रितेश सध्या त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. दरम्यान आज शिवजयंचीनिमित्त रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला आहे. याचा फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे.
रितेश देशमुख सोशल मीडियावर काय पोस्ट करतो याकडे सर्वांचंच लक्ष असतं. लातूरचा हा मराठमोळा मुलगा आज देशभरात नाव कमावत आहे रितेशच्या घरी राजकारणाचा वारसा असला तरी त्याने अभिनयात यायचं ठरवलं. इथे त्याने नावही कमावलं. आज शिवजयंतीनिमित्त त्याने पोस्ट शेअर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तो लीन झाला आहे. यासोबत त्याने लिहिले, "ज्यांनी रयतेच्या कर्माचा, धर्माचा, मानसन्मानाचा, अवघ्या जन्माचा विचार केला. आपले अवघे अस्तित्वच ज्या राजांच्या दूरदृष्टीचा भाग आहे. अशा निर्मोही योद्ध्याला, सर्वज्ञ सम्राटाला, आराध्य दैवताला, राजाधिराज शिवछत्रपतींना माझा अदबमुजरा. साष्टांग नमन."
रितेशच्या पोस्टवर सर्वांनी 'जय शिवराय' कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर दुसरीकडे रितेशच्या 'राजा शिवाजी' सिनेमाचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. सिनेमाच्या सेटवरचा फोटोही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसला. रितेश-जिनिलियाच्या प्रोडक्शअंतर्गत हा सिनेमा बनत आहे.